सेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांचा सत्यानाश झाला

By admin | Published: May 7, 2017 01:13 AM2017-05-07T01:13:01+5:302017-05-07T01:13:01+5:30

गुलाबराव पाटील यांचा घणाघात : सध्या महाराष्ट्राला आली मोठी सूज; शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रम

The language of the people who finished the army was destroyed | सेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांचा सत्यानाश झाला

सेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांचा सत्यानाश झाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांसह पक्ष सोडून गेलेल्यांचा सत्यानाश झाला आहे, अशी घणाघाती टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी येथे केली. सध्या महाराष्ट्राला एक मोठी सूज आली असून, दोन-चार ‘लॉसेक्स’च्या गोळ्या दिल्यावर ती उतरेल, अशा शब्दांत मित्रपक्ष भाजपलाही नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
कोल्हापूर शिवसेनेच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा व पदाधिकारी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक, शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, महापालिका परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे, राहुल चव्हाण, मंगल साळोखे, किशोर घाटगे, दीपक गौड, जयवंत हारुगले, उदय पवार, वैशाली राजशेखर, दिग्दर्शक यशवंत भालकर, आदींची होती. दरम्यान, मंत्री पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक, आजी, माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पक्ष सोडून गेलेला एकही जण सुखी नसून नारायण राणे यांना दररोज एक वाटी औषधांच्या गोळ्या लागतात. छगन भुजबळ हे दुसरे आसाराम बापू झाले आहेत, तर राज ठाकरेंचे काही सांगायलाच नको, अशी सर्वांची अवस्था झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
शिवसेना संपविण्याची सुपारी घेणारे सगळे संपले असून, त्यातील शेवटचे एकनाथ खडसे असून, त्यांचे काय झाले ते आपण पाहतच आहोत, असेही त्यांनी सांगितले.
जे कॉँग्रेसच्या राजवटीत झाले त्यापेक्षाही वाईट दबावतंत्र सध्या सुरू आहे, अशा शब्दांत भाजपचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सध्या थोडा वाईट काळ असला तरी शिवसेनेला कोणी संपवेल ही डोक्यातील भीती शिवसैनिकांनी काढून टाकावी. कारण काम करणाऱ्यांविरोधात कुठलीच लाट आडवी येऊ शकत नाही. आपल्या कामाशी इमानदार राहा, लोकांची कामे करा, स्वत:ची पदे टिकवा, असा कानमंत्रही त्यांनी शिवसैनिकांना दिला.
डॉ. शिवरत्न शेटे यांनी नाव न घेता भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्ता आल्यावर काही पक्षांना मस्ती आली असून, जेवढा त्रास कॉँग्रेसने दिला नाही तितका त्रास त्यांच्याकडून दिला जात आहे. साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरून भगव्याला चिरडण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी निरपेक्ष व कडवट शिवसैनिकांची फौज आहे तोपर्यंत यांच्या सात पिढ्या आल्यातरी शिवसेनेला संपविणे कठीण असल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैभव नाईक, उदय पोवार, वैशाली राजशेखर, दीपक गौड यांची भाषणे झाली. पद्माकर कापसे यांनी स्वागत केले.


जोपर्यंत तुमच्यामागे
शिवसेना तोपर्यंत तुम्ही
आपल्यातही आता खेकडे होत आहेत. एकमेकांना पुढे न जाऊ देण्यासाठी ‘टांगा’ मारल्या जात आहेत. हे स्वत:साठी व पक्षासाठीही हानीकारक आहे, जोपर्यंत तुमच्या मागे ‘शिवसेना’ हे नाव आहे तोपर्यंत तुम्ही आहात, जेव्हा हे नाव तुमच्या मागून जाईल तेव्हा तुमचा ‘कार्यक्रम’ होईल, असा इशारा मंत्री पाटील यांनी शिवसैनिकांना दिला.


आमिषाला बळी पडू नका
अनेक शिवसैनिकांना भाजपकडून फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून पदांची आमिष दाखविले जात आहे. त्याला बळी पडून भगव्याशी व शिवसेनाप्रमुखांशी गद्दारी करू नका, अशी हात जोडून विनंती करतो, असे भावनिक आवाहन डॉ. शेटे यांनी केले.



शिवसेना मुस्लिमविरोधी नाही
जाणीवपूर्वक शिवसेना ही मुस्लिमविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे, परंतु हे खोटे आहे. कारण पक्षामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम असून, दिवसेंदिवस येणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.


पक्षांतर करणार नसल्याची शपथ घ्या
मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, कधीही पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहूया, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.

Web Title: The language of the people who finished the army was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.