लमाणवाडातील टाकी कोरडीच
By admin | Published: May 17, 2017 11:14 PM2017-05-17T23:14:02+5:302017-05-17T23:14:02+5:30
चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अर्ध्यावरच
रवींद्र हिडदुगी । लोकमत न्यूज नेटवर्क
नेसरी : नेसरीपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे हडलगे (ता. गडहिंग्लज) पैकी लमाणवाडा वसाहतीसाठी शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गेल्या चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. या टाकीमध्ये पाणी कधी पडणार, असा प्रश्न लमाणवाडावासीयांत आहे.
जेमतेम १०० वस्ती असणाऱ्या लमाणवाडा वसाहतीकरिता मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी गावपुढाऱ्यांकडून पाठपुरावा न झाल्याने ना रस्ता, ना पाणी अशा अवस्थेत इथली जनता जीवन जगत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेली ही वसाहत कोळसा तयार करून विकण्याचा व्यवसाय करते; पण जंगलतोडीवर मर्यादा आल्याने त्यांना आता शेती व गुरे, शेळीपालन करून उपजिविका करावी लागत आहे.
सुरुवातीस कमी असलेली लोकसंख्या आता मुलाबाळांसह १००वर पोहोचली आहे. या वसाहतीसाठी द्विशिक्षकी शाळा असून १२ विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षणासाठी चिमुकल्यांना २ ते ३ कि.मी. रस्ता तुडवून जावे लागते. पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होतात.
सध्या त्यांना घटप्रभा नदी व वसाहतीशेजारी असलेल्या कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे. मात्र, नदीपात्रात वरून वाहून येणाऱ्या मृत प्राण्यांच्या (कुत्रे, रेडके) दुर्गंधीमुळे त्यांना कूपनलिकेचाच आधार आहे, परंतु कूपनलिकेचेही पाणी आटल्यास त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांची ही गरज ओळखून हडलगे ग्रामपंचायतीने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाईपलाईन खोदली, तसेच दहा हजार लिटर क्षमतेची आरसीसी टाकी उंचावर बांधली. तसेच गावकऱ्यांच्या दारापर्यंत पाईपलाईन टाकून नळही बसविले; पण त्यामध्ये आतापर्यंत पाण्याने स्पर्श केलेला नाही. लाखो रुपये खर्चून निर्माण केलेल्या योजनेचा नागरिकांना लाभ होत नसेल तर या योजना काय कामाच्या? शासन व ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून ही टाकी पाण्याअभावी कोरडी आहे. रस्ता, वीज व पाणी या मूलभूत सुविधांपैकी गतवर्षी या वसाहतीमध्ये फक्त वीज
पोहोचली आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर या वसाहतीमध्ये प्रकाश पडला. आता पाणी कधी पडणार, असा प्रश्न आहे.
दृष्टिक्षेपात
लमाणवाडा वसाहत
ही महाराष्ट्र व
कर्नाटक राज्याच्या सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत आहे.
ही वसाहत हडलगे ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे.
या वसाहतीकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता जंगलातून आहे.
आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसाठी त्यांना नेसरी किंवा कर्नाटकातील दड्डी या गावावरच अवलंबून राहावे लागते.