गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी कंदील, कलश, लाईटच्या माळांचा प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 04:57 PM2020-08-13T16:57:07+5:302020-08-13T16:59:16+5:30
घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर : घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे.
यंदा मालाचे उत्पादन कमी झाल्याने दरात १० टक्के वाढ झाली आहे; तर मुंबईहून मालाची आवक झालेली नसल्याने यंदा स्थानिक बाजारपेठेतूनच हे साहित्य खरेदी करून त्याची विक्री केली जात आहे.
यंदा गणेशोत्सव काही दिवसांवर आला असला तरी कोरोनाने सणाचा उत्साह जणू काढूनच घेतला आहे. रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसत असली तरी प्रत्यक्ष दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारा ग्राहक कमी झाला आहे. त्याला अपवाद सजावटीच्या साहित्याची दुकानेही राहिलेली नाहीत.
गौरी गणपतीच्या सजावटीत विद्युत रोषणाईला विशेष महत्त्व असते. फार सजावटीच्या वस्तू न ठेवता केवळ विद्युत रोषणाई केली तरी आरास खुलून दिसते. त्यामुळे गणेशोत्सवात या विद्युत उपकरणांची मोठी खरेदी केली जाते.
सजावटीचा सगळा माल मुंबईतून आणला जातो; पण आता कोरोनामुळे व्यावसायिक तेथे जायला तयार नाहीत; त्यामुळे सध्या गांधीनगरसारख्या स्थानिक बाजारपेठेतून त्यांची खरेदी करून कोल्हापुरात विक्री केली जात आहे. शाहूपुरीतदेखील मोठ्या प्रमाणात एलईडी माळा बनवल्या जातात.
यंदा मालाचे उत्पादन कमी झाले आहेत तसेच आवक नसल्याने गतवर्षीचेच साहित्य पुन्हा मांडण्यात आले आहे. शिवाय यामुळे त्यांच्या दरात अंदाजे पाच ते १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
साहित्य आणि दर असे
- सोनेरी कंदील : एक नग : १६० रुपये
- कलश माळ : १५० रुपये
- रोटेशन बल्ब, स्टार, कमळ : ३०० रुपये
- एलईडी माळा १५० रुपयांपासून पुढे
माल आणायला मुंबईला गेलो तर क्वारंटाईन व्हायला लागणार; शिवाय कोरोनाचा संसर्गाची भीती आहे. त्यामुळे यंदा स्थानिक बाजारपेठेतून विद्युत माळांची खरेदी केली आहे. भारतीय बनावटीच्या साहित्याला मागणी असली तरी ते चायनीजप्रमाणे फॅन्सीसुद्धा असावे, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.
- हरीश दहेडा (व्यावसायिक)