अपुरा निधी अन् प्रभागाचा व्याप मोठा
By Admin | Published: February 12, 2015 11:41 PM2015-02-12T23:41:15+5:302015-02-13T00:56:44+5:30
ड्रेनेज लिंकिंग रखडले : सर्व सुविधा सानेगुरूजी वसाहतीत हव्यात; सर्व्हिस रोड असणारा एकमेव प्रभाग
कोल्हापूर : शहराचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उपनगर असणाऱ्या सानेगुरुजी वसाहत प्रभागामध्ये अंतर्गत रस्ते, ड्रेनेजअंतर्गत पाईपलाईन तयार असूनही मुख्य वाहिनीची जोडणी लांबल्याने ड्रेनेजची समस्या काही प्रमाणात तोंड वर काढू लागली आहे. याचबरोबर शहराप्रमाणेच दवाखाना, क्रीडांगण आणि बहुतांशी नागरी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. या प्रभागात क्रशर चौक, बीडी कामगार चाळ, शिवराम पोवार कॉलनी, राजोपाध्येनगर, दत्त महाराज कॉलनी, सूर्यवंशी कॉलनी, नंदिनी रेसिडेन्सी, देवणे कॉलनी, शिरगावकर कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, शांतीवन, हनुमान तरुण मंडळ परिसर, डायना पार्क, काशीद कॉलनी, जोतिबा मंदिर परिसर, आदी मोठे क्षेत्र आहे. प्रभागात मागील निवडणुकीवेळी सात हजार मतदार होते. त्यात नव्याने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उपनगर असल्याने नवनवीन होणाऱ्या वसाहती व अपार्टमेंटमुळे अंतर्गत गटारी, रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणताना नगरसेवकांची मोठी दमछाक होते. शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सर्व प्राथमिक सोयीसुविधा या प्रभागातही मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे. पूर्वी कचऱ्याचा उठाव वेळोवेळी होत नव्हता. मात्र, नगरसेवकांच्या जागरूकतेमुळे ही समस्याही मिटली. अंतर्गत रस्ते, गटारी नसल्याने पावसाळ्यात काही भागांत चिखलाचे साम्राज्य तयार होते. प्रभागाचा आवाका मोठा असल्याने काही भागांचा विकास लवकर, तर काही भागांचा विकास वेळाने होत आहे. याशिवाय काही भागांतील मोठे रस्ते खासगी जागांमुळे डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. प्रभागात मंजूर असलेली बागही पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याशिवाय डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे.
बोंद्रेनगर रिंगरोड येथे जाण्यासाठी राधानगरी रोड ते गंगाई लॉन येथे मोठा रस्ता झाला, तर नागरिकांचा तीन किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. त्यामुळे हा रस्ता व्हावा, अशी मागणीही जोर धरत आहे. भौगोलिक रचनेमुळे ड्रेनेजची उंची अधिक व रस्ते तीव्र
उताराचे झाले आहेत. यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून गाडी चालविणे दूरच पायी चालणेही मुश्कील होत आहे.
माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी महापालिका व नगरोत्थान आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून मोठा विकास निधी मंजूर करून आणला आहे. त्यातून रस्ते, गटार, ड्रेनेज, बाग, दवाखाना, बॅडमिंटन कोर्ट, बॉक्सिंग रिंग, आदी कामे पूर्णत्वाकडे नेत आहे. यापुढेही काही महिन्यांनी नगरसेवकपदाचा कार्यकाल संपला तरी काही कामे आधीच मंजूर करून ठेवल्याने ही कामे यापुढेही सुरूच राहतील. आजही प्रभागाच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. यापुढेही देत राहू.
- शारंगधर देशमुख, नगरसेवक