नव्या वर्षाचा जल्लोष जरा जपून; कोल्हापूर शहर, जिल्ह्यात नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:17 PM2022-12-31T13:17:02+5:302022-12-31T13:17:30+5:30

पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठडीतच नव्या वर्षाचे स्वागत करावे लागेल

Large police deployment in Kolhapur in the wake of Thirty First | नव्या वर्षाचा जल्लोष जरा जपून; कोल्हापूर शहर, जिल्ह्यात नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त

संग्रहीत फोटो

Next

कोल्हापूर : सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. ३१ डिसेंबर साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार, घटना घडू नये, अपघात, हाणामारी, टवाळखोरी आणि हुल्लडबाजी होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त नेमला आहे. शनिवारी दुपारी चारपासूनच पोलिस चौकाचौकांत थांबून वाहनांची तपासणी करणार आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे. सुमारे दीड हजार पोलिस कर्मचारी आणि ३०० होमगार्डचे जवान तैनात करण्यात येणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना अनेकांकडून पार्टीचे आयोजन केले जाते. रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या रंगीत, संगीत पार्ट्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: मद्य प्राशन करून बेदरकारपणे वाहने चालवणे, रस्त्यावर गोंधळ घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, विनापरवाना रात्री उशिरापर्यंत ध्वनियंत्रणा सुरू ठेवून विनाकारण त्रास देणे असे प्रकार होतात. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

उघड्यावर बसून कोणीही मद्य प्राशन करू नये, यासाठी पोलिसांकडून ओपन बारवर कारवाया करण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरही पोलिसांची नजर आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन किंवा जल्लोष करण्यावर निर्बंध घातले आहेत. वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

निर्भया पथकांचीही सार्वजनिक ठिकाणी नजर राहणार आहे. महिला आणि तरुणींची छेडछाड रोखण्याचे काम निर्भया पथकांकडून होणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ब्रेथ ॲनालायझर पुरवले आहेत. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठडीतच नव्या वर्षाचे स्वागत करावे लागेल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Web Title: Large police deployment in Kolhapur in the wake of Thirty First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.