शिवाजी विद्यापीठ कोरोना केअर सेंटरमध्ये जेवणात अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:16 PM2020-07-25T15:16:23+5:302020-07-25T15:20:48+5:30
शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागातील कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शुक्रवारी दुपारी अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णांनी आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबर वादावादी केली. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. सुमारे दोन तास यावरून गोंधळ सुरू होता.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागातील कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शुक्रवारी दुपारी अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णांनी आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबर वादावादी केली. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. सुमारे दोन तास यावरून गोंधळ सुरू होता.
शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग यांच्या वतीने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागांमध्ये हे ३५० बेडचे सेंटर आहे. यामध्ये सध्या १७० रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिकेचे डॉक्टर उपचार करीत आहेत. जेवणाची सोयही महापालिकाच करीत आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास जेवण वाटप केल्यानंतर एका रुग्णाच्या जेवणात भातामध्ये अळ्या आढळून आल्या. त्याने ते संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर इतर रुग्णही संतप्त झाले. याचबरोबर अलगीकरण कक्षातील नागरिकही निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्यावरून जमा झाले.
या सर्वांनी मिळून आरोग्यसेवकास जाब विचारला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार झाला. सुमारे दोन तास गदारोळ सुरू होता.
जेवणात अळ्या असल्याची एका रुग्णाची तक्रार आली आहे. उर्वरित लोकांनी जेवण चांगले होते असे सांगितले आहे. तरीही ही अन्न व औषध प्रशासनाकडून जेवणाची तपासणी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती नोडल ऑफिसर यांनी दिली आहे
सुविधांचा अभाव
अलगीकरण कक्ष अथवा कोरोना केअर सेंटरमधील लोकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. बाथरूमच्या कड्या खराब झाल्या आहेत. महिलांना त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. जेवणही ही निकृष्ट दर्जाचे मिळते. डासांचा प्रादुर्भाव आहे. अशा तक्रारी येथील नागरिक करत आहेत.
अलगीकरण कक्ष कोरोना सेंटर वादाच्या भोवऱ्यात
अलगीकरण कक्षात सुविधा नसल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी एका मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. शुक्रवारी खराब जेवण मिळत असल्याचे समोर आहे. एकूणच कोरोना सेंटर वादाच्या भोवऱ्यात आहे.