Corona vaccine-जिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:24+5:302021-04-10T12:47:36+5:30
CoronaVirus vaccine Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला संथपणे लसीकरण सुरू राहिले. परंतु ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सरसकट परवानगी मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करायला सुरुवात केली. अशातच येणारी लस अपुरी पडू लागली. गेले दोन दिवस जिल्ह्यात लसटंचाई निर्माण झाली आहे. दिवसभरामध्ये केवळ उपलब्ध असलेले सहा हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दुपारनंतर ही प्रक्रियाच बंद करण्यात आली.
शुक्रवारी दिवसभरामध्ये राज्य पातळीवर लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु राज्यभरातच टंचाई असल्याने आता लसीची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकत होते. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही नागरिकांनी फोन करून लसीबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.
चौकट
यड्रावकर यांच्याकडून प्रयत्न
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील लसटंचाईमध्ये लक्ष घातले असून त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. राज्याला काही लाख डोस उपलब्ध होत असून त्यांतील काही डोस जिल्ह्यासाठी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठीच्या नियोजनासाठी वाहने तयार ठेवण्याच्या सूचना यड्रावकर यांनी केल्याचे सांगण्यात आले.
चौकट
दुसऱ्या डोसचे काय?
अनेकांनी मार्चमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र तो डोस घेऊन महिना होत आला असताना लस संपली आहे. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नेमका दुसरा डोस कधी घ्यायचा याचा खुलासा करण्याची मागणी होत आहे. हा खुलासा करताना किमान दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्याची मागणीही होत आहे.
चौकट
लसीकरणामध्ये राधानगरी अव्वल, तर हातकणंगले शेवटी
लसीकरणाच्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या डोसमध्ये राधानगरी तालुक्याने ६०.७१ टक्के लसीकरण करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे; तर हातकणंगले २८.७० टक्के लसीकरण करून शेवटच्या स्थानावर आहे. चंदगड ५४.४२ टक्के, गगनबावडा ४७.४५, शाहूवाडी ४१.०३, कागल ३७.४०, आजरा ३७.०१, गडहिंग्लज ३६.०२, पन्हाळा २९.७१, शिरोळ २९.२८, भुदरगड २९.०५, करवीर २८.७९ अशी अन्य तालुक्यांतील टक्केवारी आहे. या वयोगटातील १५ लाख २३ हजार ३७२ लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यांपैकी ३३.५४ म्हणजे ५ लाख १० हजार ८९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राधानगरी आणि चंदगड तालुक्यांनी लसीकरणामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल या तालु्क्यांचे अभिनंदन केले आहे.