लेसर किरणांनी डोळ्याचे पडदे फाटले, कोल्हापूर जिल्ह्यातील २०० तरुणांच्या डोळ्यांना इजा

By संदीप आडनाईक | Published: September 2, 2024 05:51 PM2024-09-02T17:51:22+5:302024-09-02T17:51:40+5:30

लेसर लाइटवर निर्बंध घालण्याची नेत्र शल्यचिकित्सक संघटनेची मागणी

Laser rays rupture the retinas of the eyes, injuring the eyes of 200 youths in Kolhapur district | लेसर किरणांनी डोळ्याचे पडदे फाटले, कोल्हापूर जिल्ह्यातील २०० तरुणांच्या डोळ्यांना इजा

लेसर किरणांनी डोळ्याचे पडदे फाटले, कोल्हापूर जिल्ह्यातील २०० तरुणांच्या डोळ्यांना इजा

संदीप आडनाईक

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत विविध उत्सवांमधील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धोकादायक लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. या कालावधीत केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील किमान २०० हून अधिक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून याविरोधात भूमिका घेत राज्यातील नेत्र शल्यचिकित्सक संघटना पुढे आल्या आहेत. महाराष्ट्र ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने या लेसर लाइटच्या वापरावर निर्बंध घालण्याची मागणी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांकडे केली आहे.

गेली काही वर्षे गणेशोत्सवदरम्यान धोकादायक लेसर लाइटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येत आहे. विशेषतः तरुण पिढीचे यात खूपच नुकसान होत आहे. याविषयी काळजी वाटत असल्यानेच नेत्र शल्यचिकित्सकांच्या संघटनेने याविरोधात पुढाकार घेतला आहे. २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत दिवाळी, नवरात्र, तसेच गणेशोत्सवादरम्यान लेसर लाइट डोळ्यांवर पडल्याने अनेक जणांच्या दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे, त्यामुळे त्यांना अंधत्वाला सामोरे जावे लागले आहे.

येणाऱ्या गणेशोत्सवात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी लेसर लाइटच्या वापरावर निर्बंध घालावेत अशी कळकळीची विनंती कोल्हापूर जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक संघटनेने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे केली आहे. लेसरच्या माऱ्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला (नेत्रपटल) छिद्र पडलेल्या अनेक रुग्णांनी डोळ्यांच्या रुग्णालयांकडे धाव घेतली. गेल्या वर्षी गणेशोत्सव, तसेच दहिहंडी आणि दसरादरम्यानच्या विविध मिरवणुकांदरम्यान लेसरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतरच्या महिन्यात डोळ्यांच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी रुग्णांनी गर्दी केली होती.

काही उपाय, सूचना

गर्दीच्या ठिकाणी, तसेच मिरवणुकीत लेसर लाइटच्या वापरावर बंदी घाला.
वापर केलाच तर लेसरची तीव्रता डोळ्यांना इजा होणार नाही इतपत कमी करा.
या लाइटचा वापर करताना दर्शकाबरोबरचे अंतर २० फुटापेक्षा जास्त ठेवा

लेसरमुळे नेत्रपटलांना इजा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. यामध्ये २० ते ३० वर्षांच्या तरुणांचा भरणा आहे. अशा लेसर किरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांकडे आग्रह धरत आहोत. -डॉ. चेतन खारकांडे, अध्यक्ष, ऑप्थॉल्मॉजिकल सोसायटी ऑफ कोल्हापूर.

Web Title: Laser rays rupture the retinas of the eyes, injuring the eyes of 200 youths in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.