शेवटच्या दिवशी उमेदवारांची तोबा गर्दी
By admin | Published: October 14, 2015 12:57 AM2015-10-14T00:57:17+5:302015-10-14T01:06:13+5:30
कोल्हापूर महापालिका निवडणूक : ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल
कोल्हापूर : राज्यात आणि देशात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षांसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, स्थानिक आघाड्यांनी सर्व शक्तीनिशी सहभाग घेतल्यामुळे चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील ८१ प्रभागांतून ६०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या आता ९१५ इतकी झाली आहे. पदयात्रा, मोटारसायकल रॅलीसह जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात कोणी उमेदवार मागे राहिले नाहीत. त्यामुळे मंगळवारी अवघे शहर निवडणूकमय होऊन गेले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा अखेरचा दिवस होता. गेले आठ दिवस पितृपक्ष व सर्वपित्री अमावास्येमुळे निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास फारसा उत्साह दाखविला नाही; परंतु अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त साधत मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज भरले. त्यामुळे शहरातील सातही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेली. सर्वच कार्यालयांत उमेदवारांनी रांगा लावून आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया सुरू
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली; परंतु त्या वेळेत कार्यालयात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येत होते. विशेषत: राजारामपुरी जगदाळे हॉल येथे मुदत संपल्यानंतरही अर्ज घेतले जात असल्यावरून कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वादावादी झाली; परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तीन वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयात पोहोचले होते, त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
शेवटच्या दिवशी १००० अर्ज दाखल
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसाअखेर ८१ प्रभागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये मंगळवारी ६०२ उमेदवारांनी १००० अर्ज दाखल केले.
शक्तिप्रदर्शनामुळे शहर निवडणूकमय
शहराच्या बहुसंख्य भागांत अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाचा डामडौल टाळत मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने नजीकच्या निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मात्र आपले वजन दाखविण्याची संधी या निमित्ताने दवडली नाही. शेकडो कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह झांजपथकांच्या गजरात पदयात्रा, मोटारसायकल रॅली काढत या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. विविध राजकीय पक्षांचे ध्वज, टोप्या आणि स्कार्फ परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या पदयात्रामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले होते.