अकरावी प्रवेश अर्जाचा आज अंतिम दिवस
By Admin | Published: June 21, 2016 11:39 PM2016-06-21T23:39:40+5:302016-06-22T00:17:57+5:30
अकरावीच्या १३ हजार ४०० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवार (दि. १६) पासून प्रारंभ
कोल्हापूर : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी मंगळवारी ४३४ अर्जांची विक्री झाली. यामध्ये सर्वांत जास्त विज्ञान शाखेसाठी ८ हजार १८७ अर्जांची विक्री झाली आहे; तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३११ अर्जांचे संकलन झाले आहे. आज, बुधवारी अर्ज विक्री व संकलन करण्याचा शेवटचा दिवस आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमधील अकरावीच्या १३ हजार ४०० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवार (दि. १६) पासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, केएमसी कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, गोखले कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या अर्ज स्वीकृती केंद्रांवर ११ हजार ४०१ जणांनी अर्ज जमा केले आहेत. कोल्हापुरातील स. म. लोहिया स्कूल, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, महावीर महाविद्यालय, कमला महाविद्यालय या अर्ज वितरण केंद्रांवर आजअखेर सायंकाळपर्यंत १५ हजार ९३३ अर्जांची विक्री झाली आहे. या अर्जविक्रीचे व संकलनाचे काम शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पी. आर. तुराळे यांच्यासह त्यांचे सहकारी करीत आहेत.
प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक
अर्ज छाननी व निवड यादी तयार करणे : २३ ते ३० जून
निवड यादीची प्रसिद्धी : १ जुलै
निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : २ ते ७ जुलै
रिक्त जागांवर व एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश : ८ व ९ जुलै