मुद्रांक शुल्क सवलतीचा शेवटचा दिवस गर्दीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:17+5:302021-04-01T04:25:17+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने लॉकडाऊन घेतलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा बुधवारचा शेवटचा दिवस होता. १.५ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी कसबा ...
कोल्हापूर : राज्य सरकारने लॉकडाऊन घेतलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा बुधवारचा शेवटचा दिवस होता. १.५ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत गर्दी उसळली.
राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ठप्प झालेला रियल इस्टेटला पुन्हा उभारी देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत दिली होती. याचे बांधकाम क्षेत्राकडून खूप स्वागतही झाले. नागरिकांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचीही संधी मिळाली. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणि बांधकाम क्षेत्राला उभारी मिळत असल्याने क्रिडाईने केलेल्या मागणीनुसार सवलतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला; पण सवलतीचा टक्का निम्याने कमी करीत तो १.५ टक्के आणला गेला. तरीदेखील प्रतिसाद चढाच राहिला.
या सवलतीची ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून मुद्रांक नोंदणी कार्यालयात गर्दी होती. सोमवारपर्यंत सलग शासकीय सुट्या आल्याने मंगळवारी कार्यालयाकडे धाव घेतली. बुधवारीदेखील ही गर्दी कायम होती. पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती कार्यालयात होती. महिना अखेरपर्यंत खरेदी केलेले दस्त पुढील चार महिने वापरता येणार असल्याने ज्यांचे व्यवहार टप्प्यात आहेत, त्यांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र कार्यालयात होते.
चौकट
महिलांना सवलत
सवलतीला आणखी तीन महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती; पण राज्य शासनाने असमर्थता दर्शविली आहे. दिलेली १.५ टक्केची सवलत मागे घेताना महिलांनी घर खरेदी केल्यास त्यांना एक टक्का सवलत लागू राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.