शाहूकालीन घाट मोजतोय अखेरच्या घटका
By Admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:28+5:302016-08-12T00:06:54+5:30
कृष्णातीरी संस्थानिक वास्तू : गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रश्न प्रलंबित
संतोष बामणे-- जयसिंगपूर -उदगाव (ता. शिरोळ) येथील जागृत श्री रामलिंग देवस्थान हे मंंदिर अकराव्या शतकातील असून, कृष्णा नदीकाठावर शाहूकालीन दगडी प्रशस्त घाट आहे. मात्र, या घाटाला सध्या अवकळा आली आहे. अनेक वर्षांपासून हा सुधारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, कन्यागतच्या निधीतून येथील दत्त मंदिर व रामलिंग मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येणार आहेत. त्यामुळे येथील गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर उमटणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची हद्द उदगाव येथून सुरू होते. सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, आदी जिल्ह्यांसह अनेक राज्यांतून नृसिंहवाडीला भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांना प्रथम कृष्णातीरी स्नानाची सोय व्हावी, या अनुषंगाने येथे गैरसोयीचाच विळखा भाविकांना घ्यावा लागणार आहे. येथील पुरातन रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्याराखाली असलेली मंदिरे आहेत. मात्र, त्यांची मोठ्या
प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे येथे घाट असून, गैरसोय अशी
अवस्था या घाटाची झाली आहे. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर अकरा घाटांप्रमाणे याही घाटाला निधी उपलब्ध करणे गरजेचे होते़ मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे.
येथे इंदुमती सरकार यांचे निवासस्थान व राजर्षी शाहू महाराज यांचे हंगामी निवासस्थान आहे. या ठिकाणी घोड्याच्या पागा, बंगला, तालीम, घाट अशा वास्तू आहेत. सध्या त्याची इतिहासात व संस्थांनी काळात नोंद आहे. येथील रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नमूद असून, घाटाप्रमाणे याही मंदिराकडे समितीचे याकडे दुर्लक्ष आहे.
येथील मंदिर हे श्री राम सीतेच्या शोधासाठी जात असताना या ठिकाणी वास्तव्य करून येथे महादेवाची स्थापना केली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी या परिसराची जोपासना केली होती.
उदगाव येथे शाहू काळात संस्थानी जकात नाका व धान्य कोठार होते. उदगाव हे सांगली-कोल्हापूर व मिरज-कोल्हापूर लोहमार्गावर असून, रेल्वे मार्गाचे काम चालू असताना रेल्वे मार्गाला वळण देऊन शाहू महाराज यांनी या मंदिराचा बचाव केला. त्या काळात मिरज येथील रानडे बंधूंनी घाट व दत्त मंदिर बांधले होते. मात्र, सध्या घाट व मंदिर दुरवस्थेत आहे.
गेल्या काही वर्षांपासून रामलिंग व दत्त मंदिराचा घाट सुधारण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होत आहे. सध्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उदगावचे तिन्हीही घाट दुरवस्थेत आहेत. त्यामुळे कन्यागतच्या पार्श्वभूमीवर या घाटांचे बांधकाम होणे गरजेचे होते. मात्र, हे होऊ शकले नाही. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- बाळासाहेब कोळी,
अध्यक्ष उदगाव सेवा सोसायटी
कृष्णा नदीकाठावरील उदगावच्या शाहूकालीन घाटाला सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हा घाट सुधारण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहे. येत्या काही दिवसांतच यासाठी चांगला निधी उपलब्ध करणार आहे. तसेच लवकरच हा घाट सुसज्ज करून नागरिकांच्या सेवेत देणार आहे.
- राजू शेट्टी, खासदार