कळंब्यातील सांडव्यानजीकचा पूल मोजतोय शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:55+5:302021-08-26T04:25:55+5:30

कळंबा : कळंबा तलावाच्या हद्दीत सांडव्यासमोरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे कमकुवत बनले आहेत. ...

The last factor is measuring the bridge near the sewer in Kalamba | कळंब्यातील सांडव्यानजीकचा पूल मोजतोय शेवटची घटका

कळंब्यातील सांडव्यानजीकचा पूल मोजतोय शेवटची घटका

Next

कळंबा : कळंबा तलावाच्या हद्दीत सांडव्यासमोरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे कमकुवत बनले आहेत. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव सांडव्यावरून दीड फुटाने ओसंडून वाहू लागल्याने पाण्याचा मोठा विसर्ग पुलाखालून झाला. परिणामी, पुलाच्या एका बाजूचा भराव वाहून गेला. पुलाच्या भिंती कमकुवत होत असल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतो. वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचे ना सर्वेक्षण, ना मजबुतीकरण झाले आहे. पुलाची उंची कमी असल्याने तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला की पुलावर पाणी येते. तलावातून वाहून येणारा कचरा, जलपर्णी पुलाच्या भिंतीत अडकल्याने जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पुलावर ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंचा भराव खचू लागला असून, पूल कमकुवत बनत आहे.

कळंबा, पाचगाव, कंदलगाव, गिरगाव, आदी मार्गांवर या पुलावरून कायमस्वरूपी वाहतूक सुरू असते. पुलाची रुंदी कमी असली तरी अवजड वाहतूक जास्त होत असल्याने पुलाची देखभाल दुरुस्ती गरजेची आहे. पुलाचे तत्काळ सर्वेक्षण करून मजबुतीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

कोट : तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा मोठा विसर्ग पावसाळ्यात होतो. अलीकडे पुलावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुलाची उंची कमी असून, स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरण तत्काळ होणे क्रमप्राप्त आहे. संबंधित प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालून कार्यवाही करावी.

- सागर भोगम, सरपंच कळंबा

फोटो : २५ कळंबा तलाव

कळंबा तलावाच्या सांडव्यासमोरील पुलाचा भराव खचला असून, जीर्ण पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

Web Title: The last factor is measuring the bridge near the sewer in Kalamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.