सत्ताधाऱ्यांचा शेवटचा ‘गेमप्लॅन’ही फसला

By admin | Published: July 26, 2016 12:34 AM2016-07-26T00:34:41+5:302016-07-26T00:38:08+5:30

‘स्वीकृत’वरून रणकंदन : सुनील कदम यांच्या राजपत्रावर सही टाळण्यासाठी नगरसचिवांचे अपहरण केल्याचा आरोप

The last 'gameplay' of the ruling party is also unsuccessful | सत्ताधाऱ्यांचा शेवटचा ‘गेमप्लॅन’ही फसला

सत्ताधाऱ्यांचा शेवटचा ‘गेमप्लॅन’ही फसला

Next

कोल्हापूर : स्वीकृत सदस्यपदावरून महानगरपालिकेत सोमवारी पुन्हा एकदा रणकंदन झाले. सुनील कदम यांच्या ‘स्वीकृत सदस्य’पदाबाबतच्या घोषित राजपत्रावर सही होऊ नये म्हणून महापालिकेतील नगरसचिव दिवाकर कारंडे यांचे अपहरण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप विरोधी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केला. त्यामुळे महापालिकेत सुमारे चार तास खळबळ माजली होती. अखेर विरोधी ताराराणी-भाजप आघाडीच्या सदस्यांनी नगरसचिव कार्यालयात ठिय्या मारून घोषित राजपत्रावर नगरसचिव दिवाकर कारंडे आणि आयुक्त पी. शिवशंकर यांची सही घेतली. त्यानंतर कदम यांच्या नगरसेवकपदाचे प्रमाणपत्र घेऊनच दालन सोडले.

महानगरपालिकेतील टोकाला गेलेल्या राजकीय ईर्ष्येतून काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तारूढ सदस्यांचा विरोध असतानाही महासभेचा ठराव राज्य सरकारने विखंडित केल्याने सुनील कदम यांचा ‘स्वीकृत नगरसेवक’पदाचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाच्या राजपत्रात सुनील कदम यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सोमवारपर्यंत महापालिकेस मिळणार होते. त्यामुळे सकाळीच सत्यजित कदम हे राजपत्राची इंटरनेटवरील प्रत घेऊन नगरसचिव कारंडे यांच्याकडे आले; पण मूळ प्रत थोड्या वेळात मिळेल, असे कारंडे यांनी सांगितले. त्यामुळे कदम निर्धास्त राहिले; पण हे राजपत्र सही होऊन घोषित होऊ नये म्हणून एक यंत्रणा कार्यरत होती.सुनील कदम यांच्या ‘स्वीकृत सदस्य’पदाला स्थगिती मिळावी म्हणून जिल्हा न्यायालयात असलेल्या दाव्यावर सोमवारी सकाळी सुनावणी होती. या सुनावणीमध्ये कदम यांच्या निवडीला स्थगिती मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे ही स्थगिती मिळेपर्यंत कदम यांचे राजपत्र घोषित होऊ नये यासाठी सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने व्यूहरचना केली होती. त्यातूनच शुक्रवारी तहकूब झालेली स्थायी समितीची सभा अचानक सोमवारी सकाळी ठेवली तसेच नगरसचिव कारंडे यांचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव आणि राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी अपहरण केल्याचा आरोप ताराराणी-भाजप आघाडीच्या गटनेत्यांनी केला. मात्र, अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नसल्याचा स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी खुलासा केला.
दरम्यान सकाळी असणारी स्थायी समितीची सभा दुपारी एक वाजता सुरू होऊन दोन तासांनी संपली. त्यानंतर या अपहरण प्रकाराचा गाजावाजा झाला. त्यामुळे ‘स्थायी’ची सभा संपल्यानंतर तातडीने सत्यजित कदम, भाजपचे गटनेते विजयराव सूर्यवंशी, किरण नकाते, आशीष ढवळे, विलास वास्कर, विजय खाडे, राजसिंह शेळके, कमलाकर भोपळे, शेखर कुसाळे, रूपाराणी निकम, महेराजबी सुभेदार, कविता माने, उमा इंगळे, आदी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी तातडीने नगरसचिव कारंडे यांना गाठले. त्यांच्यासमोर ठिय्या मारून कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदाबाबत आलेल्या राजपत्रावर सही घेऊन त्यांना तातडीने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे नेले, तेथेही आयुक्तांची सही घेऊन कदम यांचे नगरसेवकपदाचे प्रमाणपत्र घेऊनच कार्यालय सोडले.


मनाईला खो
सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्तीला अविनाश सकट यांनी न्यायालयात दावा दाखल करून हरकत घेतली आहे. त्यांनी न्यायालयात आपला रहिवासी पत्ता राजेंद्रनगर येथील भावाच्या घरचा दिला आहे. ते मूळ सदर बाजार येथे राहतात. चार स्वीकृत सदस्य यापूर्वी एकाच गटातील महापालिका ठरावाने घेतले आहेत तर एक निवड ठरावाने नाकारली आहे तसेच ही एक निवड ही डॉक्टर, इंजिनिअर या वर्गातील असावी, असा मुद्दा न्यायालयात मांडून कदम यांच्या निवडीला मनाई मिळावी, असे दाव्यात म्हटले होते; पण न्यायालयाने सोमवारी सुनावणीला ७ आॅगस्ट २०१६ ही पुढील तारीख दिली. त्यामुळे कदम यांच्या नावाच्या मनाईला ‘खो’ बसला.


अपहरणाचा विषयच नाही : स्थायी सभापती
माझ्याकडून नगरसचिव कारंडे यांच्या अपहरणाचा विषयच नाही. सकाळी स्थायी सभेत कोणीही हजर नसल्याने दुपारी १ वाजता सभा घेण्याचे जाहीर करून मी नगरसचिव कारंडे यांना घेऊन शाहू नाक्यानजीकच्या वैभव सोसायटीकडे गेलो. तेथील अनेक मिळकतींना घरफाळा लावलेला नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथे ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातील आणखी १० अधिकाऱ्यांना बोलाविले होते. तेथून आल्यानंतर ‘स्थायी’ची सभा सुरळीत पार पाडली. कदम यांच्याबाबत न्यायालयात सुनावणी होती हे मला माहीतही नव्हते, तसेच त्या प्रकरणाचा माझा काही संबंधही नाही, असा खुलासा स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
नगरसचिवांनी केला मोबाईल ‘स्वीच आॅफ’
सभापती मुरलीधर जाधव यांनी नगरसचिव कारंडे यांना गाडीत घालून नेले. दरम्यान, सत्यजित कदम यांनी कारंडे यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सत्यजित कदम यांनी पुन्हा सभापती जाधव यांना फोन केला असता आम्ही दहा मिनिटात येऊन स्थायी समितीची सभा घेऊ, असे सांगितले. त्यानंतर मात्र कारंडे यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ लागला. त्यानंतर ताराराणी-भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे धाव घेऊन कारंडे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी कारंडे यांना वारंवार फोन लावला असता त्यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होता. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ माजली.
अचानक ‘स्थायी’ सभा अन् सुनावणी
सुनील कदम यांचे राजपत्र महापालिकेत आल्यानंतर ते सोमवारी नगरसचिव सही करून घोषित करणार होते तर याच वेळेच कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदाबाबत मनाई मिळण्याबाबत न्यायालयात सुनावणी होती तसेच अचानक स्थायी समितीची सभा झाली. तिन्हीही घटना महत्त्वाच्या होत्या. न्यायालयातून मनाई मिळाली असती तर राजपत्र घोषित करण्यात अडचणी होत्या. त्यामुळे कदम यांचा नगरसेवकपदाचा निर्णय पुन्हा रेंगाळणार होता. घोषित राजपत्रावर न्यायालयाच्या निर्णयाअगोदर सही होऊ नये म्हणून नगरसचिव कारंडे यांचे अपहरण केल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला.
वैभव सोसायटीकडे गेलो : कारंडे
माझे कोणीही अपहरण केले नव्हते. सकाळी स्थायी सभापतींच्या आदेशानुसार वैभव सोसायटीची पाहणी करण्यासाठी त्यांच्याच सोबत गेलो होतो. तेथील सुमारे २०० मिळकतींना अद्याप घरफाळा लागू केला नसल्याचे मला सांगितले होते. दोन्हीही आघाडीकडून वारंवार मोबाईलवर फोन येत असल्यामुळे मी माझा मोबाईल बंद ठेवला असल्याचा खुलासा कारंडे यांनी केला.
दोन्हीही नेत्यांच्या आदेशाने अपहरण
नगरसचिव कारंडे यांचे अपहरण हे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्हीही नेत्यांच्या आदेशाने झाल्याचा आरोपही यावेळी सत्यजित कदम यांनी केला.

Web Title: The last 'gameplay' of the ruling party is also unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.