हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:49 PM2020-12-14T17:49:10+5:302020-12-14T17:50:30+5:30
Wrestling, Kolhapurnews देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शाहूपुरी पहिल्या गल्लीतील शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. पार्थिव तालमीमध्ये आल्यानंतर एरव्ही शड्डूचा आवाज घुमणारी शाहूपुरी तालीम सोमवारी मात्र नि:शब्द झाली.
कोल्हापूर : देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शाहूपुरी पहिल्या गल्लीतील शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. पार्थिव तालमीमध्ये आल्यानंतर एरव्ही शड्डूचा आवाज घुमणारी शाहूपुरी तालीम सोमवारी मात्र नि:शब्द झाली.
हिंदकेसरी खंचनाळे यांचे निधन झाल्याची वार्ता कुस्तीक्षेत्रात सोमवारी उजडताच पसरली. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून कुस्तीप्रेमींची पावले शाहूपुरी तालमीत पडू लागली. एकसंबा (ता. चिक्कोडी) या गावातून प्रथम हिंदकेसरी खंचनाळे यांनी याच तालमीत कडव्या कुस्तीचे धडे वस्ताद महमद हनिफ, आदी दिग्गज वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली घेतले होते.
येथूनच त्यांच्या पहिल्या हिंदकेसरीचा प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे याच तालमीशी त्यांची नाळ शेवटपर्यंत राहिली. निधनानंतर त्यांचा पार्थिव सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी तालमीत शेवटच्या दर्शनासाठी आणले गेले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, वस्ताद रसूल हनिफ, मुकुंद करजगार, ज्येष्ठ प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, रामप्रसाद जयराम जांभळे (इंदोर), बापू मकानदार यांच्यासह नव्या जुन्या मल्लांनी पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. या दरम्यान येथे सराव करणारे मल्ल खंचनाळे अण्णांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालमीच्या चौकात चारीबाजूंनी नि:शब्द होऊन उभे होते.