किरवले यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 12:25 AM2017-03-05T00:25:30+5:302017-03-05T00:25:30+5:30
कोल्हापुरात अंत्यसंस्कार : सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले
कोल्हापूर : ‘अमर रहे, अमर रहे, किरवले सर अमर रहे’ अशा घोषणांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्यावर शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर निळ्या झेंड्यात गुंडाळून त्यांचे पार्थिव ठेवले होते. अंत्ययात्रेत त्यांची पत्नी कल्पना, मुलगी अनघा यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, ‘श्रमुद’चे डॉ. भारत पाटणकर यांच्यासह साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले (रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर) यांची शुक्रवारी दुपारी त्यांच्या कोल्हापुरातील घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. आर्थिक व्यवहाराच्या कारणांतून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा जनक्षोभ उसळला होता. या हत्येचा सर्वबाजूंनी तपास करावा अशी संतप्त कार्यकर्त्यांची मागणी होती.
शनिवारी सकाळी डॉ. किरवले यांच्या मृतदेहाचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) विच्छेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील दसरा चौकातून डॉ. किरवले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत ‘अमर रहे, अमर रहे; किरवले सर अमर रहे’अशा घोषणा देण्यात येत होत्या. अंत्ययात्रा बिंदू चौकात शोकसभेत अनेकांची आदरांजलीपर भाषणे झाली. पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले. अंत्ययात्रेत आमदार सतेज पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पार्थ पोळके, व्यंकाप्पा भोसले, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, डॉ.विश्वनाथ शिंदे, आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, तसेच या मागील मुख्य सूत्रधार शोधण्यात यावा.
-रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री.
बाबांच्या हत्येमागे व्यक्तिगत कारण नक्कीच नाही. गुरुवारी रात्री मी बाबांशी पुण्यातून फोनवरून बोलले. त्यांच्या बोलण्यावरून घरगुती कारण नक्कीच नाही, ते शुक्रवारी (दि. ३) रात्री नाशिकला जाणार होते. तोपर्यंतच त्यांची हत्या झाली.
- अनघा किरवले, मुलगी
पाच तास ठिय्या
डॉ. किरवले यांच्या मारेकऱ्याला अटक करावी, या मागणीसाठी दलित कार्यकर्त्यांनी शनिवारी पाच तास सीपीआर परिसरात ठिय्या आंदोलन केले. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी संशयित प्रीतम पाटील आणि त्याच्या आईला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर हा तणाव निवळला.