आखरी रस्त्याचे काम म्हणजे निष्क्रियतेचा नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:51+5:302021-04-07T04:23:51+5:30
कोल्हापूर : शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावरील जलवाहिनी, ड्रेनेज लाईनच्या कामाबरोबरच नवीन रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच ...
कोल्हापूर : शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावरील जलवाहिनी, ड्रेनेज लाईनच्या कामाबरोबरच नवीन रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामाचे जगातील हे पहिलेच उदाहरण असावे. रातोरात रस्ते, पाईपलाईन बदलण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असताना, कोल्हापुरातील हे काम म्हणजे अधिकारी, ठेकेदार यांच्या निष्क्रियतेचा एक नमुनाच म्हणायला हवा.
प्रचंड रहदारी असलेला आणि कोकणाला जोडणारा गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता म्हणजे शहरातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. प्रचंड रहदारी असूनही गेल्या अनेक वर्षांत हा रस्ताच करण्यात आला नाही. २०१९ च्या जुलै, ऑगस्ट महिन्यात महापूर आला आणि अनेक दिवस हा रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी त्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे लक्ष गेले. त्यांनी निधी उपलब्ध करून रस्ता नव्याने करण्याचे ठरविले.
पुढे या रस्त्याखालील जलवाहिन्या, ड्रेनेजची कामे निघाली. रस्ता करण्याआधी ही कामे करून घेणे क्रमप्राप्त होते. प्रशासनाने प्राधान्यक्रमाने जलवाहिनी व ड्रेनेजलाईन टाकण्याची कामे हाती घेतली. कामे होण्याची कालमर्यादा ओलांडून गेली तरीही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यात केवळ खाचखळगे, दगड- माती, भकासपणाच पाहायला मिळतो. रस्त्यावरून जाताना तुम्ही कोल्हापूर शहरातून चालला आहात, यावर विश्वास बसणार नाही, इतके वाईट स्वरूप रस्त्याला प्राप्त झाले आहे.
सध्या कोणतेही काम सुरू नाही. रस्ता तसाच पडून आहे. या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नसावे, ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण नसावे, अशीच एकंदर परिस्थिती आहे. तांत्रिक अडचणी आहेत, अनेक जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन तेथे आहेत, त्यामुळे कामाला विलंब होतोय, असा अफलातून युक्तिवाद अधिकारी करतात. जगात एवढे मोठे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण महानगरपालिकेला त्याचा आधार घेऊन काम करता येईना, याचेच आश्चर्य वाटते.
- नागरिकांचा संयम संपला
रस्त्याचे काम रखडल्यामुळे या मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्यांचा संयम आता संपला आहे. त्याचा उद्रेक व्हायची वेळ अधिकारी बघत आहेत का, असा सवाल नागरिक करत आहेत. वेळोवेळी निवेदने देऊन, चर्चा करून सुध्दा अधिकाऱ्यांमधील निष्क्रियता जरा सुध्दा कमी झालेली दिसत नाही.
- अधिकाऱ्यांना रस्त्यावरून फिरवा
खराब रस्त्यामुळे तेथील नागरिकांच्या वेदना कळायच्या असतील, तर त्या रस्त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांना रोज प्रवास करायला भाग पाडले पाहिजे, ती वेळ लांब नाही, अशा कडवट प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
आखरी रास्ता कृती समितीचे निवेदन
आखरी रास्ता कृती समिती गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचा पाठपुरावा करत आहे. मंगळवारीही त्यांनी सहायक आयुक्त विनायक औंधकर यांना निवेदन दिले. गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता सुयोग्य व टिकाऊ करावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. किशोर घाटगे, राजेश पाटील, सुरेश कदम, आर. एन. पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.