Lata Mangeshkar: अन् 'त्या' घटनेनंतर लतादीदी कोल्हापूरपासून दुरावल्या, नेमकं असं काय झालं जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 01:01 PM2022-02-06T13:01:16+5:302022-02-06T13:07:53+5:30
जयप्रभा स्टुडिओवरुन झालेला वाद मात्र चांगलाच गाजला
कोल्हापूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. आपल्या सूरमधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांवर मोहिनी घालणाऱ्या लतादीदींनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
गेली ६-७ दशकांपासून लतादीदींनी सुरमयी आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं होते. कोल्हापूरशी लतादीदीचे खास नातं होतं. पन्हाळ गडावर असलेल्या घरात राहण्यासाठी लतादीदी वर्षातून दोनदा कोल्हापूरला यायच्या.
जयप्रभा स्टुडिओवरुन झालेला वाद मात्र चांगलाच गाजला. स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला.
जयप्रभा स्टुडिओ आणि वाद
लता मंगेशकर आणि भालजींसह त्यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध होते. त्या भालजींचा शब्द अखेरचा मानायच्या. मुंबईला गेलेल्या लतादीदी भालजींमुळे पुन्हा कोल्हापूरशी जोडल्या गेल्या. भालजींवर बँकेचे कर्ज असल्याने जयप्रभा स्टुडिओ लिलावात काढण्याची वेळ आली. लतादीदींनी हा स्टुडिओ विकत घेतला.
स्टुडिओचा व्यवहार होताना मात्र भालजींनी लतादीदींना या परिसराचा वापर केवळ चित्रपट व्यवसायासाठीच केला जावा अशी अट घातली होती. भालजी असेपर्यंत लतादीदींनी शब्द पाळला. पुढे काही वर्षांनी स्टुडिओ वगळता मोकळी जागा विकासकाला विकण्यात आली.
पण लता मंगेशकर यांनी सुरुवातीच्या टप्प्यात स्टुडिओच्या विकासासाठी तयारी दर्शवली होती. अखेर २०१२ साली स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला. या घटनेनंतर त्या कोल्हापूरपासून दुरावल्या.