Lata Mangeshkar: शालिनी स्टुडिओमध्ये लहानपणी गिरवला अभिनयाचा कित्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:46 PM2022-02-07T12:46:10+5:302022-02-07T12:49:52+5:30
लताचा आवाज ‘पिकोला’ जातीचा आहे. जो युनिडारेक्शनल असतो. त्यामुळे ती गाताना तिच्या शेजारी उभे राहिलेल्या माणसालासुद्धा तिचा आवाज ऐकू येत नाही; पण माईकमध्ये बरोबर जातो.
- प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर
लता मंगेशकर! संगीताच्या सात सुरांसारखी ही सात अक्षरं! सर्वार्थांनी मोठ्या असलेल्या या गायिकेचा उल्लेख एकेरी केला तरी वाचताना खटकत नाही ना? साहजिकच आहे, आईला आपण कुठे अहो-जाहो करतो? देवाला कुठे अहो-जाहो करतो? मग जिच्या स्वरांनी आपल्यावर आईसारखी माया केली, जिच्या स्वरांनी आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार घडविला, तिला ‘अहो-जाओ’त अडकवून परकं कसं करणार?
लताचं बालपण कोल्हापुरात गेलं. राहायला मंगेशकर कुटुंब मंगळवार पेठेत असलं तरी कामासाठी लता शालिनी स्टुडिओमध्ये मा. विनायककांकडे. माझे सासरे कै. गो. रा. कोलटकर विनायकांचे शिक्षक, सहकारी व नंतर विनायकांचे मॅनेजर, लतानं ‘फुले वेचिता’ या आठवणींमध्ये लिहिलेय की, शालिनी स्टुडिओच्या एका मजल्यावर चिंचलीकरांचं कार्यालय व खालच्या मजल्यावर कोलटकरसाहेबांचं कार्यालय होतं, तेच हे कोलटकर. त्यांनी मला सांगितलेली एक आठवण खूप मजेची आहे.
लहानगी लता दुपारी कोलटकरांच्या आॅफिसच्या खोलीत लंगडी घालत यायची व म्हणायची, ‘मला कंटाळा आलाय, काहीतरी काम सांगा.’ कोलटकर त्यावर नुसते हसायचे. एके दिवशी तिचं लक्ष कोपऱ्यातील केरसुणीकडे गेलं. ती एकदम कोलटकरांनी म्हणाली, ‘मी तुमचं ऑफिस झाडून देऊ?’ पण कोलटकर हे औचित्यांचं पूर्ण भान असलेले; त्यामुळे ते म्हणाले, ‘तुम्ही कलाकार मंडळी आहात. तुम्हाला काम सांगायचा अधिकार फक्त विनायकांना आहे. कंटाळा आला असेल तर काहीतरी वाचत बसा किंवा बाहेर खेळायला जा.’ तेव्हा लता फुरंगुटून बाहेर जायची व गाभुळलेल्या चिंचा पाडून त्या पेटत्या गवतात भाजून खायची. या चिंचा खाण्यावरून तिनं लहानपणी विनायकांकडून बोलून घेतलं किंवा सध्याच्या भाषेत ओरडा खाल्ला !
‘खजांचि’ या चित्रपटाच्या वेळी घेतलेल्या गीत-गायन स्पर्धेत छोट्या लतानं यश मिळवलं आणि ‘खजांचि’च्या संगीतकार गुलाम हैदर यांचं लक्ष तिनं वेधून घेतलं. गुलाम हैदर यांनी लताला मुंबईच्या काही चित्रपट निर्मात्यांकडं नेलं आणि गायला सांगितलं; पण त्यावेळच्या प्रचलित दमदार आवाजाच्या गायिकांपुढे लताचा आवाज निर्मात्यांना आवडला नाही. तेव्हा हैदर त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आज हा आवाज नाकारताय; पण भविष्यात तुम्हाला या आवाजासाठी रांगा लावाव्या लागतील.’ गुलाम हैदर यांचे हे शब्द किती खरे ठरले!
कमालीचा सुरेलपणा हे लतांचं एक प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक सुराभोवती एक छोटंसं वर्तुळ असतं. त्या वर्तुळात कुठेही सूर लावला तरी तो मानवी कानांना सुरेलच वाटतो; पण जर सूर त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला लागला तर? लताचं तसंच होत असे. आधी काहीही न गुणगुणता एकदम नेमका स्वर लावणं फार अवघड. ‘महल’ या चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याचा पहिला भाग त्या दृष्टीने मुद्दाम ऐकावा. शास्त्रीय संगीतातले दिग्गज बडे गुलाम अली खॉँ, जगन्नाथबुवा पुरोहित, कुमार गंधर्व हे गाणं पुन:पुन्हा ऐकत असत व थक्क होत असत.
सुरुवातीच्या काळात लतानं नूरजहॉँंच्या गानशैलीचं अनुकरण केलं, असा एक लोकप्रिय समज आहे; पण हे पूर्णांशानं खरं नाही. नूरजहॉँ एकदम पाकिस्तानात गेल्यामुळे हडबडूून गेलेले संगीतकार के. दत्ता, सज्जाद हे चाली बांधताना नूरजहॉँच्या शैलीत बांधायचे. मग ते गाणं लतानं गायलं तरी ते नूरजहॉँसारखं वाटायचं. लताला या स्पेलमधून बाहेर काढलं अनिल विश्वास, नौशादसारख्या संगीतकारांनी.
लताच्या आधीच्या गायिका गाण्याच्या अभिव्यक्तीमध्ये श्रेष्ठ होत्या; पण आवाज कमावलेले व ढाले; त्यामुळे ते हिरॉईनला शोभत नसत. नूरजहॉँ, सुरैय्यांचा अपवाद ! त्यामुळे कोणत्याही सप्तकात सहज जाणारा, कायम टवटवीत असणारा लताचा आवाज सर्वच संगीतकार पसंत करू लागले.
माझा असा सिद्धान्त आहे की, लताचं वय एक वर्षानं वाढलं की तिच्या आवाजाचं वय सहा महिन्यांनी वाढतं. म्हणूनच वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी ती आठ वर्र्षांच्या मुलीच्या आवाजात गाऊ शकली. ‘मी म्हणेन तुजला दादा दादिटल्या.’ चित्रपट - चिमुकला संसार आणि सर्वसाधारणपणे पार्श्वगायिकांची कारकीर्द वयाच्या ३०-३५ वर्षांपर्यंत असत. असं असताना लता वयाच्या ६०-७० वर्षांपर्यंत प्लेबॅक देऊ शकली.
शब्दांच गांभीर्य
शब्दोच्चारांकडं लतानं किती गांभीर्यानं पाहिलं. ‘पतंगा’ चित्रपटातील ‘दिल से भुला दो तुम हमें’ हे गाणं घ्या. त्यात ‘हम दुनिया से रूठ जायेंगे’ या ओळीत ‘जायेंगे’ या शब्दातील ‘जा’ हे अक्षर तिनं कसं घेतलंय. ‘ज्या’ आणि ‘ज्यॉ’ यांच्यामधला तो उच्चार आहे आणि मुख्य म्हणजे ज्या ‘पूर्णिमा’ या अभिनेत्रीच्या तोंडी हे गाणं आहे, तिच्या फुगीर गालाला तो उच्चार किती शोभून दिसतो! या सर्व गोष्टी संगीतकार थोडाच सांगणार आहे? गाता-गाता कलाकारांकडून कधी-कधी त्याच्याही नकळत झालेली ही निर्मिती असते. लताची प्रतिभा दिसते ती अशी. ‘दुर्गेशनंदिनी’ चित्रपटातील ‘कहॉँ ले चले हो’ या गाण्यात ‘खयालों की’ या शब्दातील ‘ख’चा उच्चार त्याच्या खालच्या नुक्त्यासकट झालेला ऐकून थक्क व्हायला होतं.
‘पिकोला’ जातीचा आवाज
लताचा आवाज ‘पिकोला’ जातीचा आहे. जो युनिडारेक्शनल असतो. त्यामुळे ती गाताना तिच्या शेजारी उभे राहिलेल्या माणसालासुद्धा तिचा आवाज ऐकू येत नाही; पण माईकमध्ये बरोबर जातो. सुरुवातीला या तिच्या आवाजाच्या जातीमुळे रेकॉर्डिंगला थोडी कसरत करावी लागे. लताला माईकच्या अगदी जवळ उभे करून इतर खड्या आवाजाच्या गायक/गायिकांना दोन/तीन फूट मागे उभे करीत. अर्थात हे खुद्द नौशादांनी मला सांगितले म्हणून लिहिले. पुढे युनिडायरेक्शनल माईकचा शोध लागला आणि गोष्टी सोप्या झाल्या.
लताच्या आवाजानं आपलं केवढं आयुष्य व्यापलंय, किती वेळा आपलं सांत्वन केलंय, कितीवेळा ऊर्जा दिलीय, कितीवेळा उल्हसित केलंय हे सांगणं फार अवघड आहे. पुढचा पॅरेग्राफ सलग आणि सजगतेने वाचला तर काय वाटते बघा -
‘हवा में उडता जाए मेरा लाल दुपट्टा,’ ‘आयेगा आनेवाला,‘ ‘रसिक बलमा,’ ‘लटपट लटपट तुझं चालणं,’ ‘है इसी में प्यार की आबरू,’ ‘तस्वीर तेरी दिल में,’ ‘हसले गं बाई हसले,’ ‘अजी रुठकर अब कहॉँ जाईयेगा,’ ‘जाने कैसे सपने में खो गई आखियॉँ,’ ‘नववधू प्रिया बी बावरते,’ ‘आप की नजरों ने समझा,’ ‘एहसान तेरा होगा मुझपर,’ ‘मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी कभी,’ ‘प्यार हुआ, इकरार हुआ,’ ‘तेरा जाना, दिल के अरमानों का मिट जाना,’ ‘नैन सो नैन नही मिलाओ,’ ‘ए मालिक तेरे बंदे हम,’ ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे,’ ‘अल्लाह तेरो नाम,’ ‘ढढो रे साजना,’ ‘बिंदिया चमकेगी,’ ‘तेरे बिना जिंदगीसे,’ ‘दीदी तेरा देवा दिवाना,’ ‘कल्पवृक्ष कन्येसाठी,’ ‘रहे ना रहे हम, महेका करेंग,े बनके कली....’
यावर काही वेगळं भाष्य करायची गरज आहे? लताचं सांगीतिक कर्तृत्व सागरासारखं असीम आहे. त्यातीलच काही रत्नं वर मांडली होती.
लताच्या आवाजाला पावित्र्य आहे. मोगºयाच्या फुलासारखा शुभ्रपणा आहे. सहाशे वर्षांपूर्वी भविष्यात काय होणार आहे हे जाणवल्यानेच ज्ञानदेवांनी लिहिले होते का -
मोगरा फुलला, मोगरा फुलला,
फुले वेचिता बहरू कळीयांसी आला . महाराष्ट्राच्या दारी इवलेसे रोप लावियेले, तयाचा वेलू गेला गगनावेरी आणि त्यानं सगळ्या जगाला वेढून घेतलं. ‘लता’ या शब्दाचा दुसरा अर्थ तरी काय? वेल! पण भाषेत जरी ‘लता’ आणि ‘वेल’ हे शब्द समानार्थी असले तरी मला असं वाटतं की, आता त्यांच्या अर्थामध्ये थोडा फरक करायला हवा.
जी कशाचा तरी आधार घेऊन वर चढते ती वेल आणि जी कशाचाही, कोणाचाही आधार न घेता, वर झेपावते ती ‘लता!’