उशिरा आलेले परीक्षार्थी पेपरला मुकले
By admin | Published: April 30, 2017 06:52 PM2017-04-30T18:52:47+5:302017-04-30T18:52:47+5:30
केंद्रीय चयन आयोगाची परीक्षा; विवेकानंद ज्युनिअर कॉलेज केंद्रावरील प्रकार
आॅनलाईन/लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : उशिरा आलेल्या परीक्षार्थींना केंद्रीय चयन (निवड) आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन) पेपरला मुकावे लागले. विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर रविवारी हा प्रकार घडला. शहरातील विविध १७ केंद्रांवर दोन सत्रांत एकूण ५३८४ उमेदवारांनी परीक्षा दिली.
मल्टी टास्किंग या अतांत्रिकपदाच्या भरतीसाठी केंद्रीय चयन आयोगातर्फे परीक्षा आयोजित केली होती. आयोगाने कोल्हापुरातील शहरामधील स. म. लोहिया हायस्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, न्यू मॉडेल इंग्शिल मेडियम स्कूल, विद्यापीठ हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, विद्यापीठ हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू कॉलेज, गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल या केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात परीक्षा घेतली.
यातील सकाळच्या सत्रातील पेपरसाठी ९ ते ९.३० ही वेळ परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडण्याची होती. मात्र, विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर निर्धारित वेळ संपल्यानंतर पावणेदहाच्या सुमारास काही परीक्षार्थी दाखल झाले. यात चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, आदी परिसरातील परीक्षार्थींचा समावेश होता. त्यांनी पेपरसाठी परीक्षा हॉलमध्ये सोडविण्यात यावे अशी मागणी येथील केंद्र प्रमुख आणि परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली.आयोगाच्या नियमानुसार निर्धारित वेळ संपल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना या पेपरला मुकावे लागले.
दरम्यान, याबाबत संबंधित परीक्षा केंद्राचे प्रमुख आणि शाहूवाडीचे गटविकास अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावर त्यांनी सांगितले की, आयोगाने परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडविण्याची वेळ सकाळी ९ ते ९.३० अशी निर्धारित केली होती. त्याची माहिती आयोगाने प्रवेश पत्रावर देखील दिली आहे. असे असताना काही परीक्षार्थी पावणेदहा वाजता केंद्राबाहेर आले. त्यांनी परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात यावी अशी मागणी केली. निर्धारीत वेळेत परीक्षा हॉलमध्ये आलेल्या परीक्षार्थींना सकाळी साडेनऊ वाजता उत्तरपत्रिकांचे वाटप केले होते. उशिरा आलेल्या परीक्षार्थींना आयोगाच्या नियमानुसार परीक्षा हॉलमध्ये सोडता आले नाही. (प्रतिनिधी)
नोंदणीपैकी निम्मे परीक्षार्थ्यांची दांडी
कोल्हापूर केंद्रावरुन या परीक्षेतील दोन्ही सत्रांसाठी ६०४८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या पेपरसाठी २६९४ परीक्षार्थी हजर, तर ३३५४ जण गैरहजर राहिले. दुसरा पेपर २६८९ परीक्षार्थींनी दिला, तर ३३५९ जणांनी दांडी मारली. या परीक्षेसाठी १७ केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे ७०० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदासाठी शहरातील काही केंद्रांवर परीक्षा झाली.