Kolhapur: स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा वारसदार ठरला, करवीर विधानसभेसाठी राहुल पाटील लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 03:25 PM2024-06-10T15:25:43+5:302024-06-10T15:26:31+5:30
राजेश पाटील यांनी केली घोषणा
कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हेच त्यांचे विधानसभा मतदारसंघाचे वारसदार असून, येणारी निवडणूक तेच लढतील, अशी घोषणा त्यांचे मोठे बंधू, श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेमुळे करवीरमधून कोण लढणार याची ताणलेली उत्सकुता संपली आहे.
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यांची पोकळी कोण भरून काढणार याची चर्चा सुरू असताना रविवारी त्यांच्या समर्थकांनी वाकरे फाट्यावरील विठाई चंद्राई लॉनवर भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमचे पालकत्व घेऊन करवीर विधानसभा लढवावी, असा निर्णय एकमताने घेतला. राजेश व राहुल पाटील या दोन्ही बंधूंपैकी विधानसभा कोणी लढवायची याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनीच घ्यावा, असे मेळाव्यात ठरवले. तो निर्णय कार्यकर्त्यांच्या वतीने गोकूळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ पाटील कुटुंबीयांना कळवला.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजेश पाटील यांनी राहुल हेच स्व. पी. एन. पाटील यांचे विधानसभेच्या राजकारणाचे वारसदार असून, तेच आगामी विधानसभा लढवतील, अशी घोषणा केली. यावेळी विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, प्रा. शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, इंद्रजित बोंद्रे, प्रा. आर. के. शानेदिवाण, रणजित पाटील, चेतन पाटील, राजकिरण मोहिते, संदीप पाटील, बी. एच. पाटील उपस्थित होते.
पी. एन. यांचा वारसा सक्षमपणे चालवू
ज्या पद्धतीने पी. एन. पाटील यांनी छोट-मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले त्यांचा तोच वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
बँक, गोकूळबाबत त्या त्या वेळी निर्णय
जिल्हा बँक, गोकूळ दूध संघात पी. एन. पाटील गटाची भूमिका त्या त्या वेळी ठरवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तर, जिल्हा बँकेबाबत बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.