Kolhapur: रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, गोंधळ; जाब विचारल्याबद्दल राजेश क्षीरसागरांकडून शेजाऱ्याला दमदाटी
By उद्धव गोडसे | Published: December 11, 2023 05:25 PM2023-12-11T17:25:51+5:302023-12-11T17:26:15+5:30
मारहाणीचे चित्रीकरण व्हायरल, पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप
कोल्हापूर : शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलच्या टेरेसवर रात्री उशिरापर्यंत दारुपार्ट्या करून गोंधळ घातल्याचा जाब विचारल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप या संकुलातील रहिवाशी राजेंद्र ज्ञानदेव वरपे (वय ५७) यांनी केला आहे. फ्लॅट सोडण्यासाठी क्षीरसागर कुटुंबाकडून दमदाटी सुरू असूनही, लक्ष्मीपुरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याबाबत तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वरपे कुटुंबीयांनी सोमवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत दिला.
वरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार क्षीरसागर हे शिवगंगा संकुलातील पाचव्या मजल्यावर राहतात, तर याच संकुलात सहाव्या मजल्यावर वरपे कुटुंबीय राहते. गेल्या वर्षभरापासून क्षीरसागर यांच्याकडून संकुलाच्या टेरेसचा गैरवापर होत आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांसोबत दारूपार्ट्या रंगतात. याबद्दल तक्रारी केल्या असता, फ्लॅट सोडून दुसरीकडे निघून जा, असे सांगितले जाते. शुक्रवारी (दि. ८) रात्री उशिरापर्यंत टेरेसवर गोंधळ सुरू असल्याने राजेंद्र वरपे हे जाब विचारण्यासाठी टेरेसवर गेले.
त्यावेळी क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्याचवेळी माजी आमदार क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज यांनीही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर वरपे फिर्याद देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी केवळ तक्रार अर्ज घेतला.
पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचा राग मनात धरून रविवारी दिवसभर क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिल्याचा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. फ्लॅटमधील विद्युत पुरवठा खंडित केला. सीसीटीव्ही कॅमे-यांची मोडतोड केली. विनयभंग केला. तसेच फ्लॅट सोडून निघून जाण्यासाठी दमदाटी केली. या प्रकारानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी वरपे कुटुंबीयांना काही दिवसांसाठी इतरत्र राहण्यासाठी जाण्याची विनंती केली. त्यानुसार घाबरलेले वरपे शाहूपुरी येथील नातेवाईकांच्या घरी गेले.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून माजी आमदार क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने दमदाटी होत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वरपे कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेसाठी राजेंद्र वरपे, त्यांची पत्नी शुभांगी, मुलगी सिद्धी आणि मुलगा शौर्य यांच्यासह माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, धनंजय सावंत, आदी उपस्थित होते.