लोटेवाडीत प्राथमिक शाळेचे वर्ग मंदिरात

By admin | Published: July 23, 2014 11:23 PM2014-07-23T23:23:22+5:302014-07-23T23:38:33+5:30

ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे

Latevadi Primary school class room | लोटेवाडीत प्राथमिक शाळेचे वर्ग मंदिरात

लोटेवाडीत प्राथमिक शाळेचे वर्ग मंदिरात

Next

गारगोटी : गेली सात वर्षे लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेत स्वत:ची इमारत असतानाही ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा वर्ग मंदिरात भरवण्यात येत आहे.
येथील प्राथमिक शाळेसाठी २००६-०७ साली सर्व शिक्षण अभियानातून पाच लाख ५० हजार रुपये खर्चून तीन खोल्यांचे षटकोणी शाळा बांधण्यात आली. पूर्वीची मध्यवस्तीतील शाळा व नव्याने बांधलेली शाळा या दोन्हीत सुमारे २५० फूट अंतर आहे. या अंतरात काही शेतकऱ्यांची शेती आहे. उन्हाळ्यात ही शेती रिकामी असते, पण पावसाळ्यात या शेतात भात पीक घेतले जाते. जून ते डिसेंबरअखेर शेतात पीक असल्याने रस्ता बंद होतो व विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे सहा महिने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांची शाळा मंदिरात भरवावी लागते. याचा त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
येथे पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग भरवण्यात येतात. सुमारे दीडशे विद्यार्थी व सहा शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व नवोदयमध्ये प्रवेश मिळवला आहे. अशा नावाजलेल्या शाळेला वर्ग उपलब्ध असतानाही केवळ काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गेली सात वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला की त्यांना मंदिर व अंगणवाडीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामशिक्षण समिती शिक्षक व पालकांना रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतात. मात्र, कार्यवाही शून्य आहे.

सभापती वैशाली घोरपडे व उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, या शाळेच्या रस्त्याबाबत शेतकरी व पालक यांच्यात चर्चा घडवून सामोपचाराने सर्वमान्य तोडगा काढला जाईल. मात्र, तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव कायदेशीर बाबींचा आधार घेऊन शाळेचा मार्ग लवकरात लवकर खुला केला जाईल. त्यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही. हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने तो सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे.

Web Title: Latevadi Primary school class room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.