सूरमंजिरी लाटकर यांना सहा महिने महापौरपद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:23 AM2019-11-02T00:23:14+5:302019-11-02T00:27:10+5:30
र्वरित तीन महिने लाटकर यांना संधी देण्याचे ठरले; परंतु गवंडी यांचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणूक लागली आणि महापौर निवडणूक घेण्यावर राज्य सरकारनेच निर्बंध आणले; त्यामुळे त्यांना आणखी दीड महिना संधी मिळाली.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राबल्याचे फळ म्हणून ‘राष्टवादी’च्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची महापौरपदी वर्णी लागणार असून, त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. याबाबत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात चर्चा होऊन तसा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिकेत महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा, तर स्थायी समिती सभापतिपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो; परंतु ही पदे महत्त्वाची असल्यामुळे त्यासाठी दोन्ही कॉँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त झाली. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायची तर पदाची खांडोळी करण्याशिवाय आघाडी नेत्यांकडे पर्याय राहिलेला नाही; त्यामुळे महापौरपदाचा कालावधी सहा महिने असा ठरवून दिला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता तीन महिन्यांपर्यंत हा कालावधी खाली आणला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सरिता मोरे यांना सहा महिन्यांकरिता महापौर केले. त्यानंतर सूरमंजिरी लाटकर यांना महापौर करण्याचे ठरले; मात्र राष्ट्रवादीअंतर्गत वादामुळे अनपेक्षित माधवी गवंडी यांना महापौरपद मिळाले. त्यांना तीन महिन्यांसाठी ते देण्यात आले होते. उर्वरित तीन महिने लाटकर यांना संधी देण्याचे ठरले; परंतु गवंडी यांचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणूक लागली आणि महापौर निवडणूक घेण्यावर राज्य सरकारनेच निर्बंध आणले; त्यामुळे त्यांना आणखी दीड महिना संधी मिळाली.
आता सूरमंजिरी लाटकर यांना महापौर करायचे झाले तर कालावधी केवळ दीड-दोन महिन्यांचाच मिळेल. तसे झाले तर तो त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, म्हणून त्यांना किमान सहा महिने तरी संधी मिळावी, असा मतप्रवाह राष्टवादीत आहे. यापुढे महापौरपदाचा बरोबर एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यातील कॉँग्रेसने मोठे मन दाखवून लाटकरांनी सहा महिने संधी द्यावी म्हणून प्रस्ताव पुढे आणला आहे. सूरमंजिरी यांचे पती राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघात चांगले काम केले. त्याचेच फळ म्हणून कॉँग्रेसकडून तशी संधी दिली जाईल, असे दिसते.
फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संदर्भ बरेच बदलले आहेत. राष्टवादीमधील काही नगरसेवकांनी पक्षाविरोधात प्रचार केला, तर भाजप-ताराराणीमधील काही नगरसेवकांनी कॉँग्रेसचा प्रचार केला आहे. शिवसेना सदस्य यावेळी कॉँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे; त्यामुळे महापौर निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.