कोल्हापूर : लातुरच्या सराफ महिलेचे २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:23 AM2018-12-25T11:23:32+5:302018-12-25T11:24:46+5:30
सोन्याचे मनी बनविण्यासाठी लातुरहून कोल्हापूरला खासगी आराम बसमधून येत असताना चोरट्याने सराफ महिलेच्या बॅगेतील २५ तोळे सोन्याचे तुकडे व दीड लाख रोकड, असा सुमारे नऊ लाख किमतीचा ऐवज हातोहात लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.
कोल्हापूर : सोन्याचे मनी बनविण्यासाठी लातुरहून कोल्हापूरला खासगी आराम बसमधून येत असताना चोरट्याने सराफ महिलेच्या बॅगेतील २५ तोळे सोन्याचे तुकडे व दीड लाख रोकड, असा सुमारे नऊ लाख किमतीचा ऐवज हातोहात लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.
अधिक माहिती अशी, सुमन ज्ञानेश्वर पोतदार (वय ४०, रा. बसवेश्वर चौक, लातुर) यांचा सराफी व्यवसाय आहे. त्या वरचेवर कोल्हापुरात जुना बुधवार पेठ येथील कारागीर आडसुळे यांच्याकडे सोन्याचे तुकडे घेऊन, त्याचे मनी बनवून घेऊन जात असतात.
नेहमीप्रमाणे त्या सोन्याचे मनी बनविण्यासाठी सोन्याचे तुकडे व दीड लाख रुपये घेऊन शनिवारी (दि. २२) शर्मा ट्रॅव्हल्स (एम. एच. २६ एन ६१३०) मधून त्या लातुरहून कोल्हापूरला आल्या. जुना बुधवार पेठ येथील कारागीर आडसुळे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी बॅग उघडण्याचा प्रयत्न केला असता, ती उघडीच दिसली.
आतमधील सोन्याचे तुकडे व रोकड गायब होती. या प्रकाराने त्या भांबावून गेल्या. नेमके कुठे सोने व रोकड चोरीला गेली हे आठवत नव्हते. प्रवासामध्येच चोरट्याने पाळत ठेवून चोरी केल्याची शंका आल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खासगी आराम बसच्या व्यवस्थापकासह चालकाशी फोनवर चर्चा करून त्यांना चौकशीसाठी बोलविले. बसमध्ये लातुरमधून किती प्रवासी कोल्हापूरला आले.
अर्ध्यावर कोण उतरले त्यांची नावे, पत्ते पोलीस घेत आहेत. पोतदार या नेहमी कोल्हापूरला येत असल्याने पाळत ठेवून चोरट्याने चोरी केली आहे. पोतदार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उतरल्या होत्या. यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणी होते, यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.