लॅटव्हियन तरुणांचा ‘टुक टुक कार प्रवास’
By Admin | Published: March 6, 2017 12:37 AM2017-03-06T00:37:06+5:302017-03-06T00:37:06+5:30
भारतीय माहितीपटाची निर्मिती : देशभर दोन रिक्षा घेऊन आठजणांची भ्रमंती
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
खरं म्हणजे हे तरुण, तरुणी युरोप खंडातील पूर्व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील लॅटव्हिया देशातील; परंतु त्यांना साहसी पर्यटनाची जबरदस्त आवड. त्यांनी भारताबद्दलची माहिती घेतली आणि बॅगा भरून थेट दिल्ली गाठली. त्यांना भारतावर लघुपट तयार करायचाय. मग चक्क दोन रिक्षा घेऊनच त्यांचे भारत भ्रमण सुरू झाले. सध्या गोव्यात त्यांचे चित्रीकरण सुरू असून भारतीयांवर ही मंडळी जाम फिदा आहेत.
एकीकडे जिल्ह्यात २१ फेबु्रवारीला जिल्हा परिषदेच्या मतदानाची झुंबड उडाली होती. त्यादिवशी निपाणीच्या पुढील तवंदी घाटात निळ्या रंगाच्या दोन रिक्षातून आलेले हे आठ विदेशी तरुण थांबले होते. कुतुहलाने त्यांची चौकशी केली असता एक भन्नाट कहाणी ऐकायला मिळाली.
लॅटव्हिया या युरोप खंडातील छोट्याशा देशातून हे सर्वजण आलेत. त्यातील रॉबर्ट विटॉल्स हा लघुपट निर्माता. रेमंडस, लिनी, आर्टिस, एलिना, विल्नीस, सॅन्डीस, रेनर्स हे त्याचे सहकारी. दिल्लीपासून त्यांनी भारत फिरायला सुरुवात केलीय. उत्तम पर्यटन, धार्मिक, साहसीस्थळी जायचं. तिथलं चित्रीकरण करायचं. असा त्यांचा दिनक्रम आहे. त्यातील रेमंडस् हा आयटी कंपनीत मॅनेजर आहे आणि साहसी सहलींचेही आयोजन करतो.
भारतातील मंदिरं, मोठे तलाव, समुद्रकिनारे, जंगलं सगळा प्रवास रिक्षातून. भारतीय नागरिकांच्या प्रेमानं ते भारावून गेलेत. रिक्षाला ही मंडळी ‘टुक टुक कार’ म्हणतात. ‘आर टुकटुकिम पा इंडिजू’ हे त्यांच्या लॅटेव्हियन भाषेतील या
लघुपटाचे नाव आहे. भारतातील ‘टूक टूक कारमधील आमचा प्रवास’
असेच काहीसे या लघुपटाचे स्वरूप राहणार आहे.
‘जस्ट अ फन’
या सगळ्या प्रवासासाठी वातानुकूलित एखादी गाडी का घेतली नाही असं विचारल्यानंतर मात्र खांदे उडवत ‘जस्ट अ फन’ असं रॉबर्ट सांगतो. या सर्वांच्या अंगात किती खोडकरपणा आहे हे छायाचित्र घेतानाही दिसून आले. छायाचित्र घेतानाही सरळ उभं न राहता त्यांनी कशी पोझ दिलीय ते आपल्याला शेजारच्या छायाचित्रात पाहायला मिळेल.