कोरडवाहू शेतीसाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ सुरू करा; यशवंतराव थोरात यांनी सूचविल्या संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 01:00 AM2021-01-27T01:00:09+5:302021-01-27T01:00:32+5:30
मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा
कोल्हापूर : राज्यातील कोणत्याही पाच कृषी महाविद्यालयांची निवड करून कोरडवाहू शेतीसाठी सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करावे. शेतकऱ्यांना चांगला व्यापारी बनविण्यासाठी त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्येक महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू व्हावा, अशा संकल्पना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी सोमवारी सुचविल्या. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत चर्चा केली.
दुसरी क्रांती कोरडवाहू शेती क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करावे. कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनवाढीबाबत प्रशिक्षण, संशोधनाचे काम या सेंटरच्या माध्यमातून व्हावे. विद्यापीठांनी उद्योग संस्थांचा समन्वय वाढवावा. त्यांना विद्यापीठ परिसरात कारखाना, कार्यालये सुरू करण्यास मदत करावी. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन संशोधन, पीएच.डी. करता येईल. पॉलिटेक्निकमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण, अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी सूचना डॉ. थोरात यांनी केली. विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजी बोलता यावे, याकरिता प्राध्यापकांना त्याबाबत पहिल्यांदा अद्यावत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्याबाबतचा पायलट प्रोजेक्ट हा रयत शिक्षण संस्थेत मी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा उपक्रमाबाबत शिक्षण विभागाने विचार करावा, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. त्यावर या संकल्पना, सूचनांबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन त्याबाबत पुन्हा एखादा आपल्याशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे उपस्थित होते.
चांगल्या शिक्षकांची पुन्हा नियुक्ती
वय वर्षे ५८ ते ६५ दरम्यानचे अनेक चांगल्या शिक्षक, प्राध्यापकांकडे ज्ञानाचा साठा आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या ज्ञानाचा वापर शिक्षण विभागाला कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचा विचार व्हावा. त्यांची मानधन अथवा अन्य तत्त्वावर पुन्हा नियुक्ती करता येईल, असे डॉ. थोरात यांनी सुचविले.