शाहू जयंतीदिनी लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:03+5:302021-03-07T04:22:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर - येत्या २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहूकालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर - येत्या २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहूकालीन लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ही माहिती दिली. लोकमतने ३४ वर्षांपासून हे संग्रहालय रखडल्याची दोन भागांची मालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेत शिर्के यांनी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची माहिती शनिवारी दिली.
कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांविषयी माहिती देणारे संग्रहालय आहे. मात्र शाहूकालीन लोकजीवन कळावे यासाठी असे संग्रहालय उभारण्याची मूळ कल्पना पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी मांडली होती. यानंतर शाहू संशोधन केंद्राकडून याबाबतची कार्यवाही सुरू झाली. त्यावेळी प्रा. टी. एस. पाटील यांची अभिरक्षक म्हणून नेमणूकही करण्यात आली. मात्र शासनाकडून पदांना मान्यता न मिळाल्याने पाटील यांनी ही नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात त्यांनी समाजातील सर्व थरातील नागरिक,व्यावसायिक, संस्था यांच्या सहकार्याने २५० हून अधिक वस्तूंचे संकलन केले. परंतु त्यानंतर याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत.
ही वस्तुस्थिती लोकमतने दोन भागांच्या मालिकेद्वारे मांडली. याची दखल घेत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रा. भारती पाटील आणि संग्रहालय विषयातील तज्ज्ञ निलांबरी जगताप यांच्याशी चर्चा केली. सध्या संग्रहालयासाठी विद्यापीठ समोरील पोस्ट ऑफिस शेजारी इमारत उभी आहे. यामध्ये येणाऱ्या शाहू जयंती दिनी हे संग्रहालय सुरू होईल असा मी शब्द देतो असे डॉ. शिर्के यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. शाहूकालीन लोकजीवन कसे होते याचे प्रत्यंतर या शिवाजी विद्यापीठाच्या या नव्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेला कळेल असा विश्वासही शिर्के यांनी व्यक्त केला.
चौकट
जागरमुळे फुटली कोंडी
लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी पंधरवड्यापूर्वी त्यांच्या जागर सदरामध्ये कोल्हापूरच्या पर्यटनाबाबत आपण कशामुळे पिछाडीवर आहाेत याची मांडणी केली होती. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. यातूनच अशा प्रकारचे हे संग्रहालय ३४ वर्षे कागदावरच असल्याची माहिती मिळाली. यानंतर प्रा. टी. एस. पाटील आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्याशी चर्चा करून लोकमतने दोन भागांच्या मालिकेत वस्तुस्थिती मांडली आणि आता कुलगुरूंनीच शाहू जयंतीदिनी हे संग्रहालय सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
कोट
शिवाजी विद्यापीठामध्ये शाहू कालीन लोकजीवनाचे संग्रहालय उभारण्याची कल्पना कशी रखडली याची माहिती लोकमतने दिली. संकलित वस्तू नेमकेपणाने मांडण्यासाठी विद्यापीठासारख्या संस्थेकडून काही ना काही कारणाने विलंब झाल्याचे यातून समजले. हा प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.
निवास माने, उद्योजक, कोल्हापूर
कोट
अशा पद्धतीचा प्रकल्प शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला होता याचीच आमच्या पिढीला माहिती नव्हती. मात्र ‘लोकमत’मुळे या प्रकल्पाची माहिती मिळाली. कोल्हापूरचे शाहूकालीन लोकजीवन समजण्यासाठी हे संग्रहालय अत्यावश्यक आहे.
यशोधन जोशी, अभियंता
मुळ कोल्हापूर सध्या पुणे