‘लोकमत अॅस्पायर’ शैक्षणिक प्रदर्शन सुरू
By admin | Published: June 4, 2017 01:24 AM2017-06-04T01:24:01+5:302017-06-04T01:24:01+5:30
उदंड प्रतिसाद : विद्यार्थी, पालकांची गर्दी; नामवंत संस्थांची माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करिअरचा योग्य मार्ग निवडण्यासह यश मिळविण्याचा मंत्र देणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला शनिवारी विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत प्रारंभ झाला. शिक्षण, करिअरसाठीच्या विविध पर्यायांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध असणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर’च्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या, सोमवारपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी’चे प्रायोजकत्व लाभले आहे.
येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते, तर द युनिक अकॅडमी, कोल्हापूरचे संचालक शशिकांत बोराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विराट गिरी, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वांत मोठे शैक्षणिक प्रदर्शन असलेल्या ‘लोकमत अॅस्पायर’मध्ये कोल्हापूरसह पुणे, मुंबई, मदुराई, सांगली, सातारा, रत्नागिरीतील शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाल्यापासून विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली. विविध नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत होते. स्टॉलधारक त्यांना चित्रफितीद्वारे अभ्यासक्रम व आपल्या संस्थेची माहिती देत होते. प्रदर्शनानिमित्त दुपारच्या सत्रात जे. पी. फौंडेशनचे प्रा. महेश देसाई यांच्या ‘जेईई, नीट, एनडीए स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावरील मार्गदर्शनाला आणि संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विराट गिरी यांच्या ‘दहावीनंतरचे करिअर’ या विषयावरील व्याख्यानाला विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. ‘सेल्फी विथ मार्कशीट’द्वारे अनेकांनी आपल्या मोबाईलवर छायाचित्र टिपून घेतले. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत गर्दी कायम राहिली.
सेल्फी विथ मार्कशीट
आपण मिळविलेल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला अपू्रप असते.
आपल्या शैक्षणिक कालावधीतील कोणत्याही वर्गाचे मिळालेले सर्टिफिकेट किंवा मार्कशीटसोबत प्रदर्शनाच्या ठिकाणी तुम्ही ‘सेल्फी’ काढू शकता.
येथे स्वतंत्र ‘सेल्फी वॉल’ तयार केली आहे. त्यासाठी खास पोशाख उपलब्ध आहे.
रोज उत्कृष्ट सेल्फी काढलेल्या एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला ‘बेस्ट सेल्फी’चे बक्षीस दिले जाणार आहे.
लकी ड्रॉमधील विजेते
सेल्फी विथ मार्कशीट - गॉगल : संग्राम राठोड, ऋतुजा पवार. परफ्युम- व्यंकटेश जयवंत भोसले, महावीर आवेकर, आकाश सागर माळी, अब्दुल रेहमान हुक्केरी, मंदार दिवशीकर, पृथ्वीराज अनिल कांबळे, ओंकार भूपेश खोतलांडे, सविता संतोष पाटील. पेन ड्राईव्ह- वैष्णवी खोत, संदीप प्रकाश गोसावी, हरेश सुरेश रावळ, सलोनी अर्जुन मेस्त्री. पिझ्झा- वर्षा बाळासो जाधव, सयाजी दादू वारके, विलास किसन संकपाळ, सायली माने, अस्मिता रवींद्र रावळ. फॅमिली डिनर- रजत शेणावी.