राधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनास प्रारंभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 10:58 AM2021-01-27T10:58:56+5:302021-01-27T11:01:36+5:30
राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, सुनील करकरे उपस्थित होते. राधानगरी अभयारण्य पर्यटनाचे आवडते स्थान असून सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा मोठा ओढा असतो.
राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, बोरबेट पदभ्रमंती, दाजीपूर ट्रेक, दाजीपूर सफारी, देवराया ही सर्व स्थाने निसर्गवेड्या लोकांना आकर्षित करीत असतात. त्यामुळे अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुुरू असणार आहे.
या स्पर्धेला शंभरहून अधिक निसर्गप्रेमींनी लोगो पाठविले. लोगोंमध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरत जंगल वन्यजीव-गवा, शेकरू, फुलपाखरू तसेच राजर्षी शाहू महाराजांवर अनेक अप्रतिम लोगो पाठविले आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.