‘लावणी भुलली अभंगाला..

By admin | Published: February 3, 2015 10:46 PM2015-02-03T22:46:35+5:302015-02-04T00:04:54+5:30

समन्वयाचा अभाव : मात्र कलाकारांची प्रामाणिक मेहनत

'Lavani is going to fall in the house of Abhangala .. | ‘लावणी भुलली अभंगाला..

‘लावणी भुलली अभंगाला..

Next

५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत मराठी नाट्य स्पर्धेत पंधरावे नाटक संगीत लावणी भुलली अभंगाला सादर झाले. हे नाटक परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई या संघाने सादर केले. शाहीर प्रभाकर व संत निळोबा यांच्यामधील लावणी श्रेष्ठ की अभंग श्रेष्ठ, या विषयावरचे कथानक या नाटकात उभे केले आहे. नाटकाची सुरुवात सांब सदाशिव या नांदीने झाली. आकर्षक नेपथ्याने लक्ष वेधून घेतले. गुरुप्रसाद आचार्य (संत निळोबा) यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने व खड्या आवाजाने नाटकात रंगत आली. निळोबांच्या तोंडी असलेले अभंग अधिक विस्ताराने गायले असते, तर मजा आणखी वाढली असती, असे वाटले. रुद्रा मुसळे (गंगा) यांनी लावणी गायिका-नृत्यांगनेची भूमिका चांगली पेलली. स्वत: गाणे म्हणून त्यावर नृत्य करणे ही गोष्ट मेहनतीची व कौशल्याची असते. एकाचवेळी गाणे व नृत्य पार पाडण्यासाठी शारीरिक क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असते. रुद्रा मुसळे (गंगा) यांनी कलावंतीण आत्मविश्वासाने, सर्व ताकद एकवटून सादर केल्याचे जाणवले. नृत्य करताना काही ठराविक अ‍ॅक्शन्स परत परत येत होत होत्या. ते टाळून वेगवेगळ्या अ‍ॅक्शन्स घेतल्या असत्या तर रंगत अजून वाढली असती. अयेश सहस्त्रबुद्धे (भवान्या नाच्या) यांनी नाच्याची भूमिका साकारताना नाच्याच्या हालचाली कोणतीही भीडभाड न बाळगता आत्मसात केल्याचे लक्षात आले. देहबोली, संवादफेक, नृत्य यावर विशेष लक्ष केंद्रीत असल्याचे त्यांच्या भूमिकेतून सिद्ध झाले. समीर मुसळे (गणप्या) हे आपल्या भूमिकेने भाव खाऊन गेले. लावण्या सादर करताना फडकरी तटस्थपणे उभे राहात होते. काही संवाद म्हणताना काही कलाकार अडखळल्यामुळे बऱ्याच चुका झाल्या. आॅर्गनवरची बोटे काही वेळा निसटून, एखाद दुसऱ्या गाण्याशी विसंगत वाजणारा स्वर खटकत होता. सवाल जवाबाचा कार्यक्रम चांगला रंगवला. प्रेमरंगी रंगले, मधुर मीलनी ही पदे अजून रंगवायला हवी होती. काही पदे भावविरहीत गायली गेली. पार्श्वसंगीत फार कमी वापरले. प्रकाशयोजना व नेपथ्य यामध्ये एकदा गोंधळ झाला. घन:श्याम जोशी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. प्रथमेश शहाणे (तबला), मंगेश चव्हाण (ढोलकी), ओंकार मोघे (पखवाज), केदार लिंगायत (मंजिरी) यांनी परस्पर समन्वयाने चांगली साथसंगत केली. काही चुका होवूनही कलाकारांनी प्रामाणिक मेहनत घेतल्यामुळे हे नाटक लक्षात राहिले. रसिक प्रेक्षकांनीही ते स्विकारले.

स्पर्धा संध्या सुर्वे

Web Title: 'Lavani is going to fall in the house of Abhangala ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.