विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळाला सुधारित निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:19+5:302021-06-03T04:18:19+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने लेबर लॉ विषयाचा सुधारित निकाल जाहीर केल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ६३५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने लेबर लॉ विषयाचा सुधारित निकाल जाहीर केल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ६३५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने बुधवारपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या २६० परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.
उत्तरतालिकेतील तांत्रिक चुकीमुळे विधी (लॉ) अभ्यासक्रमातील लेबर लॉ विषयाचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांनी त्याबाबत विद्यापीठाच्या तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार नोंदविली होती. या तांत्रिक चुकीची शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने क्लस्टर यंत्रणेकडून दुरूस्ती करून घेतली. या विद्यार्थ्यांचे संगणक प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा मंडळाकडे गुण आले. त्यानंतर पुढील प्रक्रिया करून या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षा मंडळाने एम्. टेक. परीक्षेचा निकाल जाहीर केला. आतापर्यंत हिवाळी सत्रामधील एकूण २६० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने बी. ए., एम. ए., एम. एस्सी. अभ्यासक्रमांची ऑनलाईन परीक्षा घेतली. त्यासाठी ८८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८२१ जणांनी परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.