सर्किट बेंचसाठी जिल्ह्यात वकील रस्त्यावर
By admin | Published: September 10, 2015 01:24 AM2015-09-10T01:24:44+5:302015-09-10T01:24:44+5:30
न्यायालयाचे काम ठप्प : मोहित शहा यांचा निषेध; गडहिंग्लजमध्ये प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा
कोल्हापूर : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ जिल्ह्याातील वकील संघटनांनी इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, मलकापूर, पन्हाळा, आदी ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारले. यावेळी वकिलांनी शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत सर्किट बेंचची मागणी केली. जिल्हा बार असोसिएशनने या बंदचे आवाहन केले होते, त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला.
जयसिंगपूर, कुरुंदवाडमध्ये निषेध
जयसिंगपूर/कुरुंदवाड : कुरुंदवाड व जयसिंगपूर बार असोसिएशनकडून प्रतिसाद मिळाला. यावेळी निषेध म्हणून कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला.
कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. आर. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या आवारातच ठिय्या मारून काम बंद आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर वकिलांअभावी न्यायालयीन कामकाज ठप्प झाले. यावेळी अॅड. देवराज मगदूम, अरुण कल्लण्णावर, जयकुमार पोमाजे, व्ही. एस. सुतार, अनिल भुजूगडे, रवींद्र गोरवाडे, सुशांत कुंभार, उमा पाटील, सुमय्या पठाण, आर. के. बारगीर, कुलकर्णी यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनाला नगराध्यक्षा मनीषा डांगे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासो बंडगर यांच्यासह नगरसेवक, पक्षकारांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
जयसिंगपूर येथेही बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
रास्ता रोको व बोंब मारो आंदोलन
गडहिंग्लज : गडहिंग्लज अॅडव्होकेट बार असोसिएशनतर्फे न्यायालय आवारात शहा यांच्या निषेधार्थ घोषणा देत रास्ता रोको व बोंब मारो आंदोलन केले.न्यायालय आवारापासून ते दसरा चौकापर्यंत शहा याच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून वकिलांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी वकिलांनी दसरा चौकात काही काळ ठिय्या मारल्याने वाहतुकीची कोंडी झाली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून वकिलांना ताब्यात घेऊन सुटका केली.
आंदोलनात अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. बी. घाटगे, उपाध्यक्ष अॅड. एस. व्ही. देसाई, सचिव अॅड. डी. बी. नागोंडा, अॅड. दशरथ दळवी, अॅड. आर. आय. पालकर, अॅड. एस. व्ही. पोवार, अॅड. संदीप फगरे, अॅड. आर. आर. चव्हाण, अॅड. एम. व्ही. पाटील, अॅड. आनंद सावंत, अॅड. एस. बी. कमते, आदींसह वकील सहभागी झाले होते.
पन्हाळ्यात कामावर बहिष्कार
पन्हाळा : जिल्हा बार असोसिएशनने दिलेल्या काम बंद आंदोलनाला पन्हाळा बार असोसिएशनने पाठिंबा दिला. सर्व वकिलांनी माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांचा निषेध नोंदवला. यावेळी कामकाजावर तीन दिवस बहिष्कार टाकल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत, अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. रवी तोरसे यांनी सांगितले.
शहांच्या प्रतीकात्मक रक्षेचे गटारीत विसर्जन; श्राद्ध घातले
कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्याच्या निषेधार्थ वकिलांनी बुधवारी दुपारी न्यायालय आवारात त्यांच्या प्रतीकात्मक रक्षेचे श्राद्ध घालून त्याचे गटारीत विसर्जन केले. यावेळी ‘न्या. शहा मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.
खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालय आवारात मंगळवारी न्या. शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन केले होते.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. न्या. शहा यांनी खंडपीठ कृती समितीला ८ आॅगस्टपूर्वी निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी निर्णय प्रलंबित ठेवत निवृत्ती घेतली. त्यामुळे संतापलेल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी न्या. शहा यांची न्यायालय आवारात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. यावेळी त्यांच्या पुतळ्याचे व तिरडीचे दहन करून शंखध्वनी केला होता. दरम्यान, वकिलांनी पुतळ्याची व तिरडीची रक्षा एकत्र करून न्यायालय आवारातच पिंड आणून विधी केला. त्यानंतर त्या रक्षेचे सीपीआरसमोरील गटारीत विसर्जन केले. यावेळी कृती समितीचे अॅड. विवेक घाटगे, कुलदीप कोरगांवकर, प्रकाश मोरे, राजेंद्र पाटील, सतीश कुणकेकर, अनिरुद्ध कुलकर्णी, सुस्मित कामत, शिशांत गुडाळकर, तेहजीज नदाफ, मनोज पाटील, आदी उपस्थित होते.