वकील, पक्षकारांनी न्यायालय परिसर गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:01+5:302021-09-08T04:30:01+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे गेले दीड वर्षे ठप्प असलेले कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने पूर्ववत ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे गेले दीड वर्षे ठप्प असलेले कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू झाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू झाले. आता काही महिने प्रलंबीत असलेले अनेक खटले निर्गमित होणार आहेत. पहिल्याच दिवशी न्यायालयीन परिसर वकील व पक्षकारांनी गजबजला होता. गर्दी पाहता आज, बुधवारपासून कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच न्यायालय आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र ॲड बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला होता, कोल्हापूरतही कोरोनाचा कहर झाला होता, अनेक वकील, पक्षकारांसह न्यायालयीन कर्मचा-यांनाही त्याची लागण झाली होती. राज्यातील न्यायालयातही हीच परिस्थती होती. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २ एप्रिल २०२१ पासून न्यायालयीन कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. महत्त्वाचे अत्यावश्यक मोजकेच खटले घेण्यात आले, अनेकवेळा व्हिडीओ कॉन्फरन्सचा आधार घेतला होता. त्यामुळे एखादा महिना अपवाद वगळता गेले दीड वर्षे न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले होते.
आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने उच्च न्यायालयाने वकील व पक्षकारांच्या अडचणी समजावून घेत मंगळवारपासून कोरोनाची नियमावली पाळत कोल्हापूर जिल्हा न्यायालये व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयीन कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली. मंगळवारी वकील व पक्षकारांनी न्यायालयीन कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतला. न्यायालय आवारात येणार्या प्रत्येकाचे सॅनिटायझिंग व थर्मल तपासणी केली जात होती. त्याशिवाय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनही वकिलांनी गजबजले होते. वाहनांचेही ताफे आवारात होते.
कोट...
पहिल्याच दिवशी वकील, पक्षकारांची गर्दी पाहता कोरोनाचा प्रार्दुभाव वाढून नये म्हणून आज, बुधवारपासून लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या वकील व पक्षकारांनाच न्यायालय आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. कामाशिवाय कोणीही न्यायालयात येऊ नये - ॲड. विवेक घाटगे, सदस्य, महाराष्ट्र ॲड बार कौन्सिल