सरकारी दवाखान्यात अनास्था, श्वान दंश रुग्णांच्या जीवावर; तरुणीच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एैरणीवर
By भीमगोंड देसाई | Published: March 6, 2024 06:07 PM2024-03-06T18:07:30+5:302024-03-06T18:08:50+5:30
ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन वेळेत देण्यास टाळाटाळ
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : श्वान दंश झाल्यानंतर वेळेत आवश्यक ते सर्व उपचार करण्यात शासकीय दवाखान्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या लोकांना काही दिवसांनी जीव गमवावा लागत आहे. कुत्रा चावला आहे, असे सांगत सीपीआर, तालुका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर त्याच्यावर वेळ मिळेल त्यावेळी उपचार केले जातात. ज्याला कुत्र्याने चावा घेतला आहे, त्याला कोणत्या प्रकारचे उपचार घेतले पाहिजेत, हे माहीत नसते. त्यामुळे संबंधित एक इंजेेक्शन घेऊन निघून जातो, असे बहुतांशी श्वान दंश प्रकरणात होत आहे.
नागाळा पार्कातील युवतीचा श्वान दंश झाल्यानंतर रेबीजने मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा आणि श्वान दंशावरील उपचाराचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्व भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावेच लागते. कुत्रा चाटला असेल, दात लागला नसेल, जखमांचे फक्त व्रण असेल तर केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागते.
कुत्र्याचे दात लागले असतील किरकोळ जखम झाली असेल तर त्याच्या ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन चोवीस तासांत एक त्यानंतर तीन दिवसांनी, सात दिवसांनी, चौदा दिवसांनी, २८ दिवसांनी घ्यावे लागते. इंजेक्शन स्नायू आणि त्वचेत घ्यावे लागते. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रक्तस्त्राव झाला असेल ॲन्टी रेबीजसह चोवीस तासांत जखमेजवळ ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन द्यावे लागते. श्वान दंश झालेल्या अनेकांना सिरमचे इंजेक्शन घ्यावे लागते, हेच सांगितले जात नाही. त्यामुळे कुत्र्याने शरीराचे लचके तोडले तरी केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन देऊन पाठवले जाते. परिणामी काही दिवसांनंतर रेबीजची बाधा होण्याचा धोका असतो.
फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो
महापालिका घरफाळा घेत असताना कुत्रा कर घेते. या करातून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बिजीकरण करणे बंधनकारक आहे. हे काटेकोरपणे केले जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यास निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. न्यायालयात भरपाईसाठी दाद मागता येते.
कधीपर्यंत अधिक धोका ?
पाणी, उजेडाची भीती वाटणे, अन्न, पाणी गिळता न येणे, श्वसनाचा त्रास होणे अशी रेबीजची लक्षणे आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चार दिवस ते सहा महिन्यांपर्यंत रेबीज होण्याचा धोका जास्त असतो. मेंदूपासून किती जवळ कुत्र्याने चावा घेतला तितका रेबीजचा धोका वाढत जातो. काही प्रकरणांत तीन, सहा वर्षांनीही रेबीज झाल्याचे पुढे आले आहे.