लक्ष्मणराव ढोबळेंना भाषण करण्यापासून रोखले
By admin | Published: February 18, 2015 01:30 AM2015-02-18T01:30:39+5:302015-02-18T01:30:39+5:30
काही काळ गोंधळ : ढोबळे समर्थकांत नाराजी; स्वतंत्र निवेदन
कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना भाषण करण्यापासून रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. माजी मंत्री ढोबळे बोलण्यास उभे राहिले. त्यावेळी ‘तुम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही, असे पहिल्यांदा जाहीर करा आणि नंतरच बोला,’ असे म्हणत विद्रोही, सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव यांनी जोरदार आक्षेप घेतला. यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. ‘नाही, नाही,’ असे माईकवरून ढोबळे सांगत होते. ढोबळे व परिवर्तनवादी विचारांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. शेवटी भाषण न करताच माईक ठेवून ढोबळे जमिनीवर आसनस्थ झाले. गोंधळावर पडदा टाकल्यानंतर ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो यांचे भाषण झाले. भाषणात त्यांनी गोेंधळाकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधून विचाराने परिवर्तन घडते, यावर आमचा विश्वास आहे. पानसरे यांच्या विचाराप्रमाणे शत्रू कमी आणि मित्र वाढवायला हवेत. शत्रूलाही विचार मांडण्याची मुभा द्यायला हवी, असे प्रतिपादन केले.
भाषणापासून रोखल्यामुळे ढोबळे यांचे समर्थक नाराज झाले. त्यांनी स्वतंत्रपणे छोटीशी सभा घेतली. तेथे ढोबळे म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीला बळ मिळावे, यासाठी मी सहभागी झालो होतो. समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन विरोध करण्याची वेळ आहे. अशावेळी ‘एका थोर विचारवंता’ने मला कधी भाजपच्या व्यासपीठावर पाहिले होते माहीत नाही. मात्र, मला बोलू दिले नाही हे चुकीचे आहे. त्यानंतर राजीव आवळे व ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.