लक्ष्मीपूजनाचे पैसे, दागिन्यांवर डल्ला
By admin | Published: November 14, 2015 12:29 AM2015-11-14T00:29:10+5:302015-11-14T00:29:38+5:30
कवठेपिरानची घटना : लाखाचा ऐवज लंपास
सांगली : लक्ष्मीपूजनानिमित्त पूजलेले पैसे व दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. कवठेपिरान (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी दोन घरात पूजलेले सोन्याचे दीड व एक तोळ्याचे असे दोन गंठण व ३१ हजार दोनशे रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित लक्ष्मण कांबळे व प्रकाश रामचंद्र देसाई हे दोघे शेजारी राहतात. कांबळे यांनी लक्ष्मीपूजनाला बाराशे रुपयांची रोकड पूजली होती. एक तोळ्याचे गंठण लक्ष्मीच्या प्रतिमेस घातले होते.
देसाई यांनीही तीस हजाराची रोकड पूजली होती. दीड तोळ्याचे गंठण लक्ष्मीच्या प्रतिमेस घातले होते. या दोन्ही कुटुंबांनी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर हे कुटुंब जेवण करण्यासाठी दरवाजा उघडा ठेवून आतील खोलीत बसले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्याने दोन्ही घरात प्रवेश करुन गंठण व रोकड लंपास केली. जेवण केल्यानंतर हे कुटुंबीय बाहेर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचा संशय आहे. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. पण अद्याप काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
गाय विकली
देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी गाय विकली होती. त्याचे तीस हजार रुपये आले होते. ही रक्कम त्यांना कौटुंबिक कारणासाठी लागणार होती. लक्ष्मीपूजनाला ही रक्कम पूजल्यानंतर ते पुढील कामासाठी त्याचा वापर करणार होते. पण तोपर्यंत चोरट्यांनी या रकमेवर डल्ला मारला.