एलबीटीप्रश्नी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
By Admin | Published: June 18, 2015 12:19 AM2015-06-18T00:19:23+5:302015-06-18T00:38:32+5:30
विवेक कांबळे : कोल्हापुरात आयोजन; पाच महापालिकांचा समावेश
सांगली : ‘एलबीटी’च्या गोंधळामुळे महापालिका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. या प्रश्नांसह इतर समस्यांबाबत उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कोल्हापूर येथे बैठक होत आहे. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच महापालिकांचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगलीचे महापौर विवेक कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, उद्या मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी महापौरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या पाच महापालिकांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यापासून आर्थिक स्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने एलबीटीची कोट्यवधींची थकबाकी आहे. दोन वर्षांत पालिकेला २३१ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात शासनाने अभयदान योजना लागू केल्याने व्यापाऱ्यांकडील वसुली थांबली आहे. त्याचा विपरीत परिणाम विकासकामांवर होत आहे. पालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारणसह आरोग्यविषयक योजना कार्यरत आहेत. त्या ७५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. २५ टक्के निधी पालिकेकडे नसल्याने योजनेच्या पूर्ततेबाबत साशंकता आहे. एलबीटीपोटीची अभयदान योजना स्थगित करावी, अशी मागणी केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात याचिका
एलबीटी रद्द करून जकात लागू करावी, या मागणीसाठी महापौर विवेक कांबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेचे उच्च न्यायालयातील वकील सुधीर प्रभू यांना दावा दाखल करण्याची सूचना केली आहे. येत्या दि. २२ अथवा २३ रोजी न्यायालयात याचिका दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.