एलबीटीप्रश्नी सात हजार व्यापाऱ्यांची यादी तयार
By admin | Published: March 2, 2015 11:55 PM2015-03-02T23:55:28+5:302015-03-03T00:29:02+5:30
माहिती संकलन सुरू : चित्रीकरण करून करपात्र रक्कम निश्चित होणार
सांगली : एलबीटी न भरणाऱ्या सात हजार व्यापाऱ्यांची नोंद महापालिकेच्या दफ्तरी झाली असून अशा सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांमधील मालाची चित्रीकरणासह माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यानंतर रक्कम निश्चित करून त्यांना त्याबाबत नोटीसा बजावण्यात येतील, अशी माहिती आयुक्त अजिज कारचे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कारचे म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील २२ ते २३ हजार व्यापारी, व्यवसायिकांची तपासणी महापालिका प्रशासनाने केली होती. कर भरण्यास पात्र असलेले १५ हजारावर व्यापारी निश्चित झाले आहेत. यातील जवळपास ४00 व्यापाऱ्यांच्या एलबीटीची रक्कम निश्चित झाली आहे. अन्य व्यापाऱ्यांच्या दुकानांमधील मालाची माहिती घेऊन किंवा येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून विवरणपत्र घेऊन रक्कम निश्चितीचे काम सुरू आहे. अद्याप ७ ते ८ हजार व्यापारी एलबीटी भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. सात हजारावर व्यापाऱ्यांची नोंद करुन त्यांची रक्कम निश्चित करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. माहिती संकलनाच्या कामाला व्यापारी छापा समजत आहेत. त्यांनीच विवरणपत्र जमा केले तर आम्हाला दुकानातून माहिती घेण्याची गरज नाही. त्यामुळे आमचे अधिकारी दुकानात जाऊन प्रत्यक्ष मालाची पाहणी करून, त्याचे चित्रीकरण करून माहिती संकलीत करीत आहोत.
रक्कम निश्चित करण्याबरोबरच अशा व्यापाऱ्यांना कर भरण्याच्या नोटिसा दिल्या जातील. जे व्यापारी नोटिसा प्राप्त झाल्यानंतर कर भरतील, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जे कर भरणार नाहीत त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी कायद्यातील तरतुदींचा वापर केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)