सांगलीतील एलबीटीचा तिढा अखेर सुटला
By Admin | Published: March 27, 2015 11:06 PM2015-03-27T23:06:34+5:302015-03-28T00:00:51+5:30
मदनभाऊ, संजयकाकांची मध्यस्थी : कर भरण्यास चार हप्ते; व्याज व दंडाचा निर्णय शासनाकडे!
सांगली : महापालिका व व्यापाऱ्यांत एलबीटी प्रश्नावरून निर्माण झालेल्या संघर्षाला आज, शुक्रवारी पूर्णविराम देण्यात आला. खासदार संजय पाटील यांच्या शिष्टाईला महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी प्रतिसाद दिल्याने एलबीटीचा तिढा अखेर सुटला. दोन वर्षातील थकित एलबीटी भरण्यासाठी चार हप्ते देण्यात येणार असून व्याज व दंडाचा निर्णय शासनाकडे सोपविण्यावर महापालिका व व्यापाऱ्यांत एकमत झाले. दरम्यान, महापालिका व व्यापाऱ्यांत झालेल्या निर्णयाची माहिती देऊन, उद्या, शनिवारी बेमुदत उपोषण मागे घेतले जाईल, असे कृती समितीचे समीर शहा यांनी जाहीर केले.
एलबीटीप्रश्नी कृती समितीने काल, गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, समितीचे समीर शहा, विराज कोकणे, सुरेश पटेल हे चौघे उपोषणाला बसले होते. आज, शुक्रवारी दिवसभर एलबीटीवर बैठका, चर्चा झाल्या. दुपारी खासदार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पाटील यांनी, एलबीटीचा भरणा महापालिकेकडे करावाच लागणार आहे, तो चुकलेला नाही. व्याज व दंडासह अमेनिटी योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून लवकरच व्याज व दंड माफ करण्याची घोषणा शासनाकडून होईल, अशी ग्वाही दिली. याचवेळी खा. पाटील यांनी, व्यापाऱ्यांनी शासनावर केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांना कानपिचक्या दिल्या.
त्यानंतर पाटील यांनी महापौर विवेक कांबळे यांच्याशी संपर्क साधून चर्चेची विनंती केली. शासकीय विश्रामगृहात खा. पाटील, मोहन गुरनानी, महापौर कांबळे, सुरेश आवटी यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय देऊ, असे सांगून महापौर कांबळे व आवटी निघून गेले. त्यानंतर या दोघांनी मदन पाटील यांची निवासस्थानी भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर, सहायक अधीक्षक अमर छाचवाले उपस्थित होते.
मदन पाटील यांनी महापौरांसह महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला खा. पाटील, गुरनानी उपस्थित होते. गुरनानी यांनी, थकित एलबीटी भरण्यासाठी चार हप्ते द्यावेत, व्याज व दंडाबाबत शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना बंधनकारक राहील असे सांगत, महापालिकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीला समीर शहा व इतर आंदोलकांना निमंत्रित करण्यात आले होते.
बैठकीत मदन पाटील यांनी व्यापाऱ्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. वाट्टेल ते वैयक्तिक आरोप करून व्यापारी नेत्यांनी कटुता निर्माण केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सुरुवातीला पाटील यांनी, २०१३-१४ चा थकित एलबीटी एकरकमी व्यापाऱ्यांनी भरावा व चालू वर्षातील एलबीटीचे दोन हप्त्यात धनादेश द्यावेत, असा प्रस्ताव मांडला. समीर शहा व आप्पा कोरे यांनी चार हप्त्यांची मागणी केली. त्यावर तब्बल अडीच तास खलबते सुरू होती. खा. संजय पाटील व व्यापाऱ्यांनी स्वतंत्ररित्या चर्चा केली.
अखेर मदन पाटील यांनी, ३१ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांनी थकित एलबीटीची २५ टक्के रक्कम रोख जमा करावी व इतर रकमेपोटी तीन हप्त्यांचे धनादेश द्यावेत, असा तोडगा मान्य केला. त्याचवेळी दंड व व्याज माफीसाठी पालिका व्यापाऱ्यांना सहकार्य करेल, अशी ग्वाहीही दिली.
व्यापाऱ्यांनी तातडीने विवरणपत्र पालिकेला सादर करण्यावर एकमत झाले. हा तोडगा व्यापारी नेत्यांनीही मान्य केला. ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांचे उपोषण मदन पाटील यांच्याहस्ते सरबत घेऊन सोडण्यात आले, तर कृती समिती सदस्यांच्या उपोषणाची उद्या, शनिवारी सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)
येणेकऱ्यांची वाट किती पाहायची? : मदनभाऊ
एलबीटीवरून महापालिका व व्यापाऱ्यांत कटुता निर्माण झाली होती. ठेकेदारांची बिले, कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्जाचे हप्ते भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच महापालिकेला नाईलाजास्तव व्यापाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घ्यावा लागला. व्यापाऱ्यांनी वसूल केलेला एलबीटी भरलाच पाहिजे. महापालिकेच्या दारात देणेकरी बसल्यानंतर आम्ही येणेकऱ्यांची किती दिवस वाट पाहायची? असा प्रश्न होता. पण आता एलबीटीवर तोडगा निघाला आहे. त्यामुळे पालिकेची गाडी रुळावर येईल. दंड व व्याजाबाबत शासनस्तरावर व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत. महापालिकाही तसा ठराव करून तो शासनाला पाठवेल. एलबीटी भरण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने हा प्रश्न कायमस्वरुपी संपल्याचे मदन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
असा निघाला मार्ग
३१ मार्चपर्यंत दोन वर्षातील थकित एलबीटीपोटी एक हप्ता पालिकेकडे जमा करावा,
व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे तातडीने विवरणपत्रे सादर करावीत
तीन हप्त्यात थकित एलबीटीसाठी धनादेश द्यावेत
दंड व व्याजाबाबत शासननिर्णयाशी बांधील
कर भरल्यानंतर गुन्हे मागे घेण्याचा प्रयत्न
उपोषणाची आज सांगता
महापालिकेतील बैठकीत एलबीटीवर तोडगा निघाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पण समीर शहा यांनी उद्या शनिवारी दुपारी चार वाजता महापालिका हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडू. व्यापाऱ्यांची सहमती घेण्याची जबाबदारी माझी राहील. त्यानंतरच आम्ही उपोषणाची सांगता करू, असे आश्वासन दिले. तर ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांचे उपोषण मदनभाऊ पाटील यांच्याहस्ते सरबत देऊन सोडविले.
फसवणूक करणाऱ्यांचे काय?
बैठकीत मदन पाटील यांनी एका व्यापाऱ्याकडून विवरण पत्रातून केलेल्या करचुकवेगिरीचे उदाहरण दिले. या व्यापाऱ्याकडून वर्षाकाठी पन्नास ट्रक माल आणला जातो. पण त्याने विवरणपत्रात केवळ एकच ट्रक माल आणल्याचे नमूद करून आठ लाख रुपयांची उलाढाल केल्याचे म्हटले आहे. अशा चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे काय करणार? असा सवाल केला. त्यावर गुरनानी व शहा यांनी अशा व्यापाऱ्यांना संघटना पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही दिली.
एलबीटीचा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. खा. संजय पाटील व मदनभाऊंनी एकत्रित येऊन तोडगा काढला. त्याचे चांगले पडसाद राज्यभर उमटणार आहेत. वसंतदादा, विष्णुअण्णांशी माझे घरोब्याचे संबंध होते. मदनभाऊंनीही व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्या तोडग्याचे ै‘फॅम’ स्वागत करते.
- मोहन गुरनानी, अध्यक्ष, ‘फॅम’
एलबीटी भरण्याचे कोणालाही चुकलेले नाही. कर भरल्याशिवाय महापालिका चालणार नाही. मदनभाऊंनी एलबीटीवर चांगला तोडगा काढला आहे. कुठेही कटुता निर्माण होऊ दिली नाही. दंड व व्याजाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर त्याबाबत राज्य शासन निर्णय घेईल.
- संजय पाटील, खासदार