दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडून ‘एलसीबी’चा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:59+5:302021-05-25T04:28:59+5:30
कोल्हापूर : गोवा येथे गुंडांच्या दोन गँगच्या वादातून भरबाजारात गोळीबार करून फरार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव ...
कोल्हापूर : गोवा येथे गुंडांच्या दोन गँगच्या वादातून भरबाजारात गोळीबार करून फरार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथे एका हॉटेलवर पकडले होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तसेच पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण गोवा जिल्ह्यातील फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांतील वादातून अन्वर शेख या गुंडावर व्हॅली डिकोस्टा, इम्रान बेपारी व त्याच्या साथीदारांनी दहशत माजवत गोळीबार केला होता. हे पाचजण फरार होऊन कोल्हापुरात गोकुळ शिरगाव येथे हॉटेलवर आश्रयास होते. ही माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो. नि. तानाजी सावंत, स. पो. नि. सत्यराज घुले, सहा. उपनिरीक्षक राजू शिंदे, पोलीस यशवंत कुंभार, राजू बंद्रे, प्रशांत कांबळे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, राम कोळी या पथकाने तत्काळ बारकोड हॉटेलवर छापा टाकून गुंडांना पकडून गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्काळ मदत व उत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.