‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 06:45 PM2019-01-07T18:45:26+5:302019-01-07T18:55:53+5:30

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

The leader of the Bhumata Sanghatana and senior eminent lawyer Dr. Ravi Shankar will be doing Parikrama 'OGGM Sang Sangam'. Direct Dialogue with Budhajirao Mulik | ‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

googlenewsNext

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा विषय आता का घ्यावा वाटला?
उत्तर : मी शिरोळचा रहिवासी आहे. नदी प्रदूषणाची सर्वाधिक झळ याच तालुक्याला बसते. महिनाभरापूर्वी आमच्याच तालुक्यातील नांदणी या गावातील भाजीपाला खाल्ला तर कॅन्सर होतो, अशी आवई उठवली गेली, याचे मला फार वाईट वाटले. आमचा काही दोष नसताना उगीच बदनामी होत असल्याने याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. योगायोग असा की, मी चालवत असलेली ‘भूमाता’ ही संघटना याच वर्षी २७ जानेवारीला स्थापनेची २५ वर्षे साजरी करीत आहे. आपल्याच गावचा

प्रश्न सोडवून विधायक पद्धतीने रौप्यमहोत्सव साजरा करूया, म्हणून हा विषय हातात घेतला.
प्रश्न : यासाठी वेगळा काही अभ्यास केला का?
उत्तर : ज्या पंचगंगेत वीसएक वर्षांपूर्वी आपण पोहलो, पाणी प्यायलो, तेथे आता रक्षाविसर्जन करण्यासाठीही लोक पाण्यात उतरताना धजावत नाहीत, हे पाहिल्यानंतर ‘संगम ते उगम’ हा उपक्रम हाती घेण्याआधी सर्वंकष तयारी सुरू केली. प्रदूषणाच्या संदर्भात आतापर्यंत झालेले सर्व्हे, कोर्टाने दिलेले आदेश, विविध संस्थांचे निष्कर्षासह अहवाल या सर्वांचे वाचन करतानाच या विषयात काम करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या उपक्रमाची दिशा स्पष्ट केली. सर्व प्रकारची संख्यात्मक व विश्लेषणात्मक माहिती जमविली.

प्रश्न : संगम ते उगमच असा मार्ग निवडण्यामागे काय कारण?
उत्तर : आतापर्यंत ‘उगम ते संगम’ अशी पंचगंगेची परिक्रमा झाली आहे. उगमाला स्वच्छ असणारी नदी संगमाला मात्र अतिप्रदूषित बनते. त्यामुळे प्रदूषणाची दाहकता कळावी या हेतूने ‘संगम ते उगम’ असा पायी दिंडीचा मार्ग निवडला. कुरुंदवाड ते प्रयाग चिखली या मार्गावर पंचगंगेत ७५० छोटे-मोठे प्रवाह येऊन मिसळतात, तर अतिप्रदूषण करणारी २५० ठिकाणे आहेत. यांना भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पुढे पृथक्करण करून पुढील जनजागृती केली जाणार आहे.

प्रश्न : महिला आणि तरुणांनाच निवडण्यामागचे कारण?
उत्तर : प्रदूषणाची सर्वांत जास्त झळ महिलांना बसते. त्यांच्याकडून प्रदूषणाला हातभारही लावला जातो. त्यामुळे या महिलांचे प्रबोधन करण्यासाठी म्हणून यांनाच या चळवळीत अधिक प्रमाणात सहभागी करून घेतले जाणार आहे. तरुणांकडे कल्पकता असते, जीव तोडून राबण्याची तयारी असते; त्यामुळे तरुणांनीच या उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हावे, यासाठी पंचगंगा खोºयातील महाविद्यालयांना भेटी देऊन आवाहन करीत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

प्रश्न : राजकारणविरहित उपक्रम आहे; मग खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांना घेण्यामागचे प्रयोजन?
उत्तर : ते बरोबर आहे. राजकारण बाजूला ठेवले आहे. जनतेने मनात आणले तर कोणतेही प्रश्न सुटू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा विचार खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांनाही पटला. विशेष म्हणजे हे दोन्हीही लोकप्रतिनिधी जनतेचाच आधी विचार करतात. पूर्णपणे नि:स्वार्थी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी असल्यानेच त्यांना आपल्यासोबत घेतले आहे. आमदार उल्हास पाटील विधानसभेतही प्रदूषणावर आक्रमक मांडणी करतात. त्यांनी प्रदूषणाची झळ सोसली आहे.

प्रश्न : उपक्रमाची पुढील दिशा काय असणार?
४ ते ७ जानेवारी अशी कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी संगम ते उगम पायी यात्रा काढून आम्ही थांबणार नाही. नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत काय आणि कधी करायचे याबाबतचा वर्षभराचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. शासनाकडे काय मागायचे, जनतेला काय सांगायचे येथपासूनच प्रगत देशामध्ये कशा प्रकारे प्रदूषणमुक्ती होते येथपर्यंत सर्व काही तयार आहे. कोल्हापुरी पाणी पूर्वीपासूनच चांगले होते, ते आता बिघडले आहे. कोल्हापुरी गूळ, चप्पल याप्रमाणे कोल्हापूरचे पाणी जगात भारी ठरविण्याचे माझे स्वप्न आहे.

Web Title: The leader of the Bhumata Sanghatana and senior eminent lawyer Dr. Ravi Shankar will be doing Parikrama 'OGGM Sang Sangam'. Direct Dialogue with Budhajirao Mulik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.