गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:04 AM2016-10-29T00:04:12+5:302016-10-29T00:16:33+5:30

नगरपालिका निवडणुका : एकमेकांच्या हालचालींवरच सर्वांचे ‘लक्ष्य’

The leader in 'Gadhinglaj' is 'careful' .. candidate 'confusion' ..! | गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

Next

राम मगदूम -- गडहिंग्लज
गडहिंग्लजमध्ये उमेदवाराबरोबरच मतदारही संभ्रमात असून, नेते मात्र सावध आहेत. सर्वच राजकीय पक्ष व गटांनी एकमेकांवर लक्ष ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. बेरीज-वजाबाकीच्या राजकारणामुळे संभाव्य उमेदवार संभ्रमात, तर नेते सावध, असे चित्र आहे. संभाव्य आघाड्यासाठीही उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या चार दशकांत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण? सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कोण? याचा अंदाज बांधणे सोपे होते. उघड हालचालींवरूनच त्यावेळी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होत आले. मात्र, सर्वार्थाने वेगळी ठरलेल्या या निवडणुकीचे सारे संदर्भच बदलून गेल्यामुळे पालिकेच्या राजकीय सारिपाटावर संभ्रमाचे ढग तयार झाले आहेत.
गतवेळी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य काँगे्रस यांच्या आघाडीविरुद्ध शहापूरकर गटाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने आघाडी केली अन् सत्तांतरही घडविले. मात्र, काठावरील बहुमतामुळे मिळालेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही. साडेतीन वर्षानंतर ‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावरांच्या पाठिंब्यावर जनता दलाने पालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि जनता दल हे दोघेही यावेळी ‘सत्ताधारी भूमिकेत’ आहेत. ऐतिहासिक ठरलेले हे सत्तांतर संभ्रमावस्थेचे पहिले कारण आहे.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जनता दल व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष नाट्यमयरीत्या एकत्र आले आणि त्यांच्या पॅनेलला यशही मिळाले. मात्र, ती ‘युती’ न रुचलेल्या राष्ट्रवादीच्या ‘काही’ नगरसेवकांची नाराजी आजअखेर कायम राहिली. त्याचे पडसाददेखील वेळोवेळी उमटले. त्यामुळेच पालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी व जनता दलाची ‘बहुचर्चित’ युती अद्याप दृष्टिपथात नाही. किंबहुना, ती दुरापास्तही ठरली आहे, हे या संभ्रमावस्थेचे दुसरे कारण.
गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदेच्या विरोधात ऐनवेळी एकत्र आलेले शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यापूर्वीच ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, तर आठवड्यापूर्वीच माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर हे देखील भाजपवाशी झाले आहेत. रिंगणे हे चव्हाणांचे सहकारी, तर यमगेकरांना शहापूरकरांनी भाजपमध्ये आणले आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर रिंगणे व यमगेकर दोघांनीही दावा केल्यामुळे विरोधी ‘महाआघाडी’चे नेतृत्व असणाऱ्या भाजपमध्येच ‘पेच’ निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना व स्वाभिमानी या मित्रपक्षांसह तिसरा पर्याय देऊ इच्छिणाऱ्या ‘महाआघाडी’चे चित्रही अद्याप दृष्टिक्षेपात नाही, हे संभ्रमावस्थेचे तिसरे कारण आहे.

Web Title: The leader in 'Gadhinglaj' is 'careful' .. candidate 'confusion' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.