नेते कोल्हापुरात; कार्यकर्ते नागपुरात
By admin | Published: December 8, 2015 12:15 AM2015-12-08T00:15:40+5:302015-12-08T00:39:04+5:30
विधानभवनावर आज मोर्चा : विविध मागण्यांसाठी हजारांवर काँग्रेस कार्यकर्ते रवाना
कोल्हापूर : विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता विधान भवनावर आज, मंगळवारी निघणाऱ्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेसचे सुमारे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहे. विशेष म्हणजे कार्यकर्ते जरी नागपूरच्या मोर्चासाठी गेले असले तरी नेते मात्र विधान परिषदेच्या निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचे निमित्त करून कोल्हापुरातच ठाण मांडून आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाव्यात, त्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, महागाईला आळा घालावा, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणावी, विविध समाजाला आरक्षण देण्यात यावे,आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज, मंगळवारी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाला कोल्हापुरातून एक हजार कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत.
जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, प्रकाश आवाडे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. अन्य तालुक्यांतून चार-पाच वाहनांतून कार्यकर्ते गेले आहेत. काही कार्यकर्ते रेल्वेनेही नागपूरला गेले आहेत. तालुक्यातील कार्यकर्ते परस्पर गेले असल्याने त्यांची संख्या नक्की समजली नाही.
कोल्हापुरात विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. पी. एन. पाटील, सतेज पाटील, प्रकाश आवाडे प्रदेश काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही मंडळी नागपूरला न जाता कोल्हापुरातच थांबली आहेत. (प्रतिनिधी)