Kolhapur Politics: संजय मंडलिक मुंबईत तळ ठोकून, माने मतदारसंघात; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:01 PM2024-03-23T13:01:54+5:302024-03-23T13:02:20+5:30
कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे ...
कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
मुंबईतून महायुतीच्या उमेदवारांची जी यादी दिल्लीला गेली आहे. त्यामध्ये मंडलिक आणि माने या दोघांचीही नावे असल्याचे सांगण्यात येते. आपल्या कोणत्याही खासदारांची उमेदवारी कापली गेली तर त्याचा आमदारांपर्यंत संदेश चांगला जाणार नाही. हे शिवसेनेसाठी तसेच महायुतीसाठीही धोक्याचे असल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना पटवून दिले आहे. त्यामुळे या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील धक्कातंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही, तोपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. संध्याकाळनंतर दोन तास त्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक, विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी उमेदवारीबाबत फारसे भाष्य न करता महायुती जो उमेदवार देईल, त्याच्या विजयासाठी परिश्रम करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या.
हालचालच करता येईना
जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत काहीच करता येईना, अशी परिस्थिती मंडलिक आणि माने यांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. कोणत्याही गावात जायचे म्हटले तरी उमेदवारीबाबत विचारले की मग होईल दोन दिवसांत जाहीर, असे सांगावे लागत आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरणाऱ्या मंडलिक यांनीही फिरती बंद करून मुंबई गाठली आहे.