पुढाऱ्यांना आता सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:43+5:302021-01-09T04:19:43+5:30
संदीप बावचे : जयसिंगपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दुरंगी, तिरंगी आणि बहुरंगी लढतींचे चित्र ...
संदीप बावचे :
जयसिंगपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दुरंगी, तिरंगी आणि बहुरंगी लढतींचे चित्र पाहावयास मिळत आहे. जोरदार प्रचार सुरू झाल्यामुळे निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मतदान, निकाल आणि त्यानंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.
युती सरकारच्या काळात सरपंच पद थेट जनतेतून निवडून दिले जात होते. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपद निवडले जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. निवडणूक आयोगाने नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. १८ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीकडे आता गावपुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट -
राजकीय संघर्ष पेटला
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संवेदनशील असणाऱ्या दत्तवाड, उदगाव, नांदणी, यड्राव, शिरढोण, दानोळी यांसह अन्य काही प्रमुख गावांतील लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामविकासापेक्षा जिरवाजिरवीच्या राजकारणाचे चित्र निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आले आहे.
चौकट -
आरक्षण गृहित धरून उमेदवारी
यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षणाविना निवडणूक होत आहे. मागील तीन वर्षातील आरक्षणाचे रोटेशन गृहित धरून अनेकजण उमेदवारी घेऊन निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. यामध्ये खुले सरपंच पदाचे आरक्षण पडेल, यावरून गणिते मांडून पॅनेलच्या बहुमतासाठी नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे.