जिल्ह्यातील नेत्यांनी मैत्री शिकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:20 AM2019-05-13T00:20:20+5:302019-05-13T00:20:27+5:30

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी ...

The leaders of the district should learn friendship | जिल्ह्यातील नेत्यांनी मैत्री शिकावी

जिल्ह्यातील नेत्यांनी मैत्री शिकावी

Next

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी दोस्ती शिकली पाहिजे, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ‘एम. आय. आर. डी.’ संस्थेने जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पालकत्व स्वीकारून काम करावे, लागेल ती मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
महाराष्टÑ इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीचे रविवारी झालेले उद्घाटन व सी. ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इमारतीच्या भूमिपूजनवेळचे कर्मचारी लिंगाप्पा भागोजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर मंत्री पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, समाजात अनेक संस्था अडचणीतून मार्गक्रमण करत असताना सूर गवसण्यास खूप कालावधी जातो. सामाजिक संस्थांसाठी ‘एमआयआरडी’ने संशोधन करून कशाची गरज आहे, हे शोधून काढा. यासाठी वयोवृद्ध लोकांची नेमणूक करून त्यांचा डाटा तयार करा. सरकार सक्षम आहे, पण सतेज पाटील तसे म्हणणार नाहीत, ते त्यांचे कामच आहे. पण तुमचेच सरकार येणार, असे त्यांनी आपल्या कानात सांगितले, असा चिमटाही त्यांनी काढला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, शरद सामंत यांनी ‘एमआयआरडी’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागते, कोल्हापूरच्या स्तरावर संशोधनासाठी यायचे झाले तर ते ‘एमआयआरडी’ मध्येच यायला पाहिजे.
संस्थेचे संस्थापक शरद सामंत म्हणाले, अनेक अडथळे पार करत इमारतीचे बांधकाम शासनाने दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण केले; पण सामाजिक काम करणाऱ्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वाईट वागणूक मिळते अशी तक्रार मंत्री पाटील यांच्याकडे केली. गिरीष सामंत यांनी स्वागत केले. ‘सायबर’, ‘बालकल्याण’, ‘अवनि’, ‘हेल्पर्स आॅफ हॅँडीकॅप्ड’ या संस्थेस दोन लाख रुपयांची मदत दिली. आमदार सुजित मिणचेकर, संजय पवार, नगरसेवक अर्जुन माने, अजित तारळेकर, संजय व्हनबट्टे, अवधूत झारापकर, पी. डी. देशपांडे, संजय परुळेकर, आदी उपस्थित होते.

दुष्काळासाठी स्टँपचा महसूल पुरेसा
सतेज पाटील यांचे टीका करण्याचे कामच आहे; पण सरकारची निधी देण्यासाठी खूप क्षमता आहे. जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असून एकट्या स्टॅँपमधून २९ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. दुष्काळ निवारण्यासाठी केवळ स्टॅँपचा महसूल पुरेसा असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

दादा, ‘ते’
‘ध्यानात ठेवलंय’
संघटनेत आता पूर्ण वेळ काम करायचं, हे आमचं ठरलंय. दादा, आता बंटींबद्दल तुम्ही ठरवा असे सांगत, वैयक्तिक काम घेऊन आपल्याकडे यायचे नाही, हे दादांनी सांगितले आहे. पण ‘दादा, आम्ही ते ध्यानात ठेवलंय’, अशी पुष्टी शरद सामंत यांनी जोडल्याने एकच हंशा पिकला.

‘सतेज’ यांचं पुढचं काय ठरलंय
व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेतानाच मंत्री पाटील यांनी ज्यांची ‘आमचं ठरलंय’ ही टॅग लाईन सूचक बोलण्यासाठी वापरली जाते, त्यांचं पुढचं काय ठरलंय हे माहिती नाही, ते आमचे परममित्र सतेज पाटील, असा उल्लेख केला. ‘सतेज’ मंत्री नसले म्हणून ते मदत करण्यास मागे राहणार नाहीत, त्यांच्याकडे क्षमता आहे. परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न असल्याने त्यांना राजकारणातूनच गोळा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The leaders of the district should learn friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.