‘केडीसीसी’त ‘महाविकास’च्या नेत्यांचा कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:20+5:302021-09-05T04:28:20+5:30

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकसंधपणे लढण्याचा निर्णय घेतला असला ...

The leaders of 'Mahavikas' will have to work hard in 'KDCC' | ‘केडीसीसी’त ‘महाविकास’च्या नेत्यांचा कस लागणार

‘केडीसीसी’त ‘महाविकास’च्या नेत्यांचा कस लागणार

Next

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकसंधपणे लढण्याचा निर्णय घेतला असला तरी जागा २१ आणि नेते ३० अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाची आपापल्या तालुक्यात सुभेदारी असल्याने जागांची सरकासरकी करण्यास केवळ दोन ते तीन जागाच राहणार असल्याने ‘महाविकास’च्या नेत्यांचा कस लागणार आहे.

जिल्हा बँकेची प्रारुप यादी प्रसिध्द झाल्याने निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘गोकुळ’प्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न आहे. ‘गोकुळ’ निवडणूकीत जागा वाटप करताना ताणाताणी झाली होती. त्यापेक्षाही जिल्हा बँकेमध्ये होणार आहे. विकास संस्था गटातील बारा जागांवरील उमेदवार ठरलेले आहेत. उर्वरित नऊपैकी प्रक्रिया संस्था गटातून खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची उमेदवारी निश्चित आहे. इतर संस्था गटातून भय्या माने हे पुन्हा रिंगणात असतील. राखीव पाचपैकी महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने तर अनुसूचित जाती, जमाती गटातून आमदार राजू आवळे हे पुन्हा असणार आहेत. पतसंस्था, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय व एक महिला या चार जागांवरच फेरबदल होऊ शकतात.

मागील निवडणुकीत शिवसेेनेचे एकमेव संजय मंडलिक हे दोन्ही काॅंग्रेससोबत होते. आता मंडलिक, निवेदिता माने व राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन जागा शिवसेनेला मिळू शकतात. मात्र, त्यावर शिवसेनेचे नेते स्वस्थ बसणार नाहीत. पतसंस्था गटातून प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी तयारी केली आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांची करवीर, पन्हाळा, गगनबावड्यात संस्थात्मक ताकद आहे. सर्वच गटात त्यांच्या संस्था असल्याने त्यांना एक जागा द्यावीच लागणार आहे. सत्यजित पाटील-सरुडकर, संजय घाटगे, उल्हास पाटील यांचीही संस्थात्मक ताकद असल्याने त्यांचाही दावा राहू शकतो. त्यात आमदार प्रकाश आवाडे हे आघाडीसोबत राहिले तर त्यांना इतर मागासवर्गीय जागा जाऊ शकते. एकूणच महाविकास आघाडीची मोट बांधण्याची घोषणा केली खरी मात्र जागा वाटप करताना नेत्यांची पुरती दमछाक उडणार, हे निश्चित आहे.

इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु

विकास संस्था व प्रक्रिया संस्था गटात कमी मतदार असल्याने येथे एका-एका मतासाठी चुरस असते. त्यामुळे संस्थेचा ठराव करण्यापासून त्याचे नियोजन केले जाते. बँकेची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी गेल्या वर्षभरात या ना त्या निमित्ताने मतदारांशी संपर्क आहे. त्यात आता प्रक्रिया सुरु झाल्याने इच्छुकांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

विनय कोरेंना विरोधी आघाडीत घेण्याचे प्रयत्न

मागील निवडणुकीत शिवसेना, भाजपने एकत्रित निवडणूक लढवून चांगली मते घेतली होती. आता त्यांच्यासोबत महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे आहेत. विनय कोरे यांनाही विरोधी आघाडीत घेण्यासाठी भाजपचे प्रदेश पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. त्यात महाविकास आघाडीत जागा मिळाली नाही तर शिवसेनेचे नेतेही विरोधी आघाडीत येऊ शकतात, त्यामुळे किमान नऊ जागांवर तरी विरोधी आघाडी तगडे आव्हान उभे करु शकते.

बिनविरोधची शक्यता धूसरच

मागील निवडणुकीत विकास संस्था गटातून ‘राधानगरी’तून ए. वाय. पाटील, ‘करवीर’मधून पी. एन. पाटील, ‘पन्हाळ्या’तून विनय काेरे तर ‘हातकणंगले’मधून महादेवराव महाडिक बिनविरोध झाले होते. चारही ठिकाणी समझोत्याचे राजकारण झाले होते, आता परिस्थिती वेगळी आहे. यावेळेला इच्छुकांची तयारी व तालुक्यातील अंतर्गत राजकारण पाहता बँकेच्या सर्वच जागांवर निवडणूक होणार, हे निश्चित आहे.

Web Title: The leaders of 'Mahavikas' will have to work hard in 'KDCC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.