‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत आज नेत्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:49+5:302021-05-13T04:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री सतेज पाटील, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांची बैठक होत आहे. यामध्ये अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा होणार असून, संचालकांसह इतर नेत्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्तांतर घडविले होते. चार जागा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला मिळाल्या होत्या. त्यानंतर अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (दि. १४) दुपारी एक वाजता होत आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. दोघांनीही सत्तारूढ गटाला हादरा देत विरोधी छावणीत जाण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही ३५ वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. हे जरी खरे असले तरी नवीन संचालकांना सोबत घेऊन नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची क्षमता पाहूनच पहिल्यांदा संधी दिली जाणार आहे.
याबाबत, गुरुवारी कसबा बावडा येथील मेडिकल कॉलेजवर नेते व संचालकांची बैठक होत आहे. पहिल्यांदा संचालकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर नेत्यांची बैठक होणार असून, यामध्ये अध्यक्षपदाच्या नावावर खलबते होतील. अंतिम निर्णय पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच घेणार आहेत.
अध्यक्ष निवड बिनविरोध होणार
सत्तारूढ गटाच्या आघाडीतून बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, चेतन नरके व शौमिका महाडिक हे चार संचालक निवडून आलेले आहेत. पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मानसिकतेतही विरोधी गट नसल्याने अध्यक्ष निवड बिनविरोध होणार, हे निश्चित आहे.