महायुतीतील नेत्यांनी फेकाफेकी बंद करावी - मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:56 AM2024-06-19T11:56:50+5:302024-06-19T11:57:16+5:30
विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाण्याची गरज
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान झाले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एकमेकांवर फेकाफेकी करू नये, यामुळे महायुतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र दिसते. यापेक्षा विधानसभा निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चाला सामोरे जाताना ते कोल्हापुरात बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय होती, त्यावर पक्षाकडून उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे खरे असेल तर बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव का झाला? इंदापूर, दौंड आदी मतदारसंघात भाजपचे बडे नेते होते. त्यामुळे उगीच एकमेकांकडे फेकाफेकी केली तर महायुतीतील बेबनाव पुढे येईल.
त्याचा निर्णय महायुतीचे नेते घेतील
लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मदत झाली नाही, त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊ नका, असे महायुतीचे पराभूत उमेदवार म्हणतात. याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्याचा निर्णय महायुतीचे नेते घेतील.
फडणवीस हे मंत्रिमंडळातच राहतील
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे बडे नेते आहेत. त्यांच्याशिवाय भाजपचे मंत्रिमंडळातील स्थान अशक्य आहे. तरीही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.